घोट येथे गुराख्यावर पट्टेदार वाघाचा हल्ला…

29
  • म्हशीने वाचविले मालकाचे प्राण,
  • मालक गंभीर जखमी

सिंदेवाही

.          वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत तांबेगडी मेंढा उपवनक्षेञातील घोट येथे एका पट्टेदार वाघाने गुराख्यावर हल्ला करून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घोट येथे घडली असून मोरेश्वर लालाजी कावळे (३९) असे जखमी गुराख्याचे नाव आहे.

.          सविस्तर वृत्त असे घोट येथील मोरेश्वर लालाजी कावळे हे नेहमी प्रमाणे आपल्या म्हशी जंगलाच्या दिशेने चारावयास घेऊन गेले होते. दिवसभर म्हशी चारून सायंकाळच्या सुमारास म्हशी घेऊन घराकडे परत येत असताना दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर जोरदार हल्ला केला आणि गंभीर जखमी केले. वाघाने मालकावर हल्ला चढवल्याचे लक्षात येताच चरत असलेल्या सर्व म्हशी एकवटल्या, आणि वाघावर जोरदार हल्ला करत वाघाला पिटाळून लावले. त्यामुळे मोरेश्वर थोडक्यात बचावला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. आणि गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे लगेच धाव घेतली. आणि संबंधित वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभाग तांबेगडी मेंढाचे वनपाल बुरांडे व वनरक्षक सोरते हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि जखमी गुराख्यास तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती केले. सध्या गुराख्यावर उपचार सुरू असून गुराखी गंभीर अवस्थेत जखमी आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून वाघाचा जास्तच धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागानी सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.