विज पडून महिला मजुराचा मृत्यू तर एक महिला गंभीर

83

 सिंदेवाही तालुक्यातील यावर्षीची दुसरी घटना

सिंदेवाही

.         नुकताच रोवण्याचा हंगाम संपून धान पिकाचे निंदनाचे काम सुरू आहे. याकरिता गावातील मजूर सकाळी सहा वाजता पासून शेतातील निंदनाचे काम करण्यासाठीं जातात. दरम्यान बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सिरकाडा येथे एका शेतावर वीज पडून एक महिला जागीच ठार झाली. तर दुसरी महिला गंभीर अवस्थेत जखमी झाली असल्याने तिला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून महानंदा मोतीराम अलोणे वय ६४ वर्षे असे मृतक महिलेचे नाव आहे. तर रोशनी प्रफुल्ल गेडाम (३८) जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे.
.         नेहमी प्रमाणे गावातील काही महिला सकाळीच शेतातील धानाचे निंदन काढायला गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतावर गेल्या. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल झाला. आणि आकाशात विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यामुळे शेतातील महिला पुरुष घराच्या दिशेने निघाले. मात्र विजांचा गडगडाट जास्तच जोरात सुरू झाला. आणि अचानक महानंदा अलोने या महिलेच्या अंगावर विज कोसळली. आणि ती जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असलेली महिला गंभीररित्या जखमी झाली. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी जावून जखमी असलेल्या रोशनी गेडाम हिला त्वरित सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात नेले. आणि घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. लागलीच बीट अंमलदार बावणे यांनी घटनास्थळ गाठून स्थळ पंचनामा केला. आणि प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदेवाही येथे पाठविण्यात आले. सिंदेवाही तालुक्यातील यावर्षीची ही दुसरी घटना असून एक दीड महिन्यापूर्वी देलनवाडी येथे वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या होत्या. तालुका प्रशासनाने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेऊन शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत कुटुंबीयांना करावी. अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून करण्यात येत आहे.