बल्लारपूर वनक्षेत्रात दोन वाघाच्या बछड्यांचा मृत्यू

34
  • एक जखमी; कळमना उपक्षेत्रातील घटना

बल्लारपूर

बल्लारपूर वनक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रात कक्ष क्र.५७२ मधील जंगलात दोन वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळून आले तर एक जखमी असलेल्या बछड्याला उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.दोन्ही बछडे आईपासून विभक्त झाल्यामुळे त्यांचा भुकेने तडफडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.जिवंत व मृत वाघांचे बछडे अंदाजे पाच वर्षाचे असल्याचे समजते.

मध्य चांदा वनविभाग अंतर्गत बल्लारपूर वनक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रात काही दिवसांपासून वाघांचे बछडे फिरतांना गस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिसून आले होते.त्यांचेवर निगराणी ठेवण्याकरिता व आईचा शोध घेण्याकरिता ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले होते.मात्र वाघिणीचा पत्ता लागला नाही.परंतु आज गुरुवार दि.७ सप्टेंबर ला सकाळी कर्मचारी जंगलात गस्त करीत असताना दोन बछडे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या झुडुपात मृतावस्थेत आढळून आले.व एक बछडा अशक्त अवस्थेत फिरतांना दिसून आला.त्यास वनकर्मचार्यांनी रेस्क्यू करून जेरबंद केले.जेरबंद बछड्यास व मृत दोन्ही बचड्याचे शव विषछेदन व उपचारार्थ वन्य जीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी प्रकल्प चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.त्यावर उपचार केल्यानंतर बछडा सुस्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.मृत दोन्ही बछड्याचे शवविषछेदन पशु वैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी प्रकल्प चंद्रपूर डॉ.कुंदन पोडचलवार व बल्लारपूर पशुधन विकास अधिकारी डॉ.दिलीप जांभुळे यांनी केले.त्याचा अहवाल आल्यानंतर बछड्याच्या मृत्यूचे कारण उघड होईल.

याबाबत बल्लारपूर वनाधिकारी नरेश भोवरे यानीं वनगुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास उपवनसंरक्षक स्वेता बोदडू, सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) यांचे मार्गदर्शनात नरेश भोवरे करीत आहेत. सदर कार्यवाही पूर्ण करण्याकरिता क्षेत्रसहाय्यक बी.टी. पुरी, वनरक्षक एस.पी.नन्नावरे, पी.एच.अनकाडे,एम.पी.धाईत, भारती तिवाडे,एस.एस.नैताम,टी. ओ. कांबळे,एस.एम. बोकडे, ए.बी.चौधरी,व पीआर्टी पथक कळमना,किन्ही यांनी सहकार्य केले.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट

मौजा दहेली येथे एका शासकीय कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी विनय गौडा व उपवनसंरक्षक श्वेता बोदडू आले असता सदर प्रकारची माहिती त्यांना मिळताच त्यांनी कळमना येथील घटनास्थळाला भेट देऊन मृतक दोन्ही बछड्याची व जिवंत असलेल्या बछड्याची पाहणी केली आवश्यक त्या सूचना केल्या.

२९ जुलैला वाघाचा अपघाती मृत्यू

बल्लारपूर वनक्षेत्रात कळमना उपवनक्षेत्रात कक्ष क्र.५७२ मध्ये वणीकरणाच्या रोपवटीकेज्वल २९ जुलैला वाघ अपघातात मृतावस्थेत आढळून आला होता.तेंव्हा पासूनच वन कर्मचारी या भागात गस्त करीत होते.यास दोन महिन्याचा कालावधी उलटला असून आता दोन बछड्याचा मृत्यू झाल्याने या परिसरात वाघाचा वावर असून वनविभाग लक्ष केंद्रित करून आहे.

वाघिणीचा शोधासाठी ट्रॅप कॅमेरे

तीन बचड्यांची वाघीण या भागात फिरत असून तिचे तिन्ही बछडे तिच्यापासून दुरावले असल्याने ती बचड्यांचा शोधत फिरत आहे.तिच्यापासून मानवास धोका होऊ शकतो त्यामुळे या परिसरात तीस ते चाळीस वनकर्मचाऱ्यांची गस्त सुरू करण्यात आली असून वाघिणीचा शोध लागताच तिला सुरक्षित जंगलात दूर नेण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येणार आहे.