माजरी कोळसा खाणीत पाणी मारणारा टँकर उलटला 

14

वेकोली कामगार गंभीर

चंद्रपुर : वेकोली माजरी क्षेत्रातील नागलोन युजी टू ओसी या कोळसा खाणीत पाण्याच्या टँकरद्वारे खाणीत पाणी मारण्याचे काम सुरु असताना अचानक टँकर उलटला. यात टँकर चालक गंभीर जखमी झाला. सदर घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी चालकाला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मधुकर जेणेकर (५९) रा. वणी  (यवतमाळ) असे जखमी चालकचे नाव आहे.

.        वेकोली अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी नागलोन खाणीत टँकर क्रमांक २८२४० या टँकरद्वारे पाणी मारण्याचे काम सुरू होते. या दरम्यान टँकरचा क्रॉस तुटला. क्रॉस तुटल्यामुळे सदर टँकर पलटी झाला. टँकर चालकाने आपल्या बचावासाठी टँकरमधून खाली उडी घेतली. यामध्ये चालकाच्या कमर व पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या चालकाला तात्काळ वेकोली माजरीच्या क्षेत्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चालकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील आरोग्यम रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी मधुकर जेणेकर हे  पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती आहे.

.        यापूर्वीही ऑगस्ट महिन्यात याच खाणीत खाजगी कंपनीतील दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता. या सर्व दुर्घटनेला वेकोलिचे अधिकारी जवाबदार असून, आज झालेल्या घटनेची वेकोलिकडून पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली नाही. वेकोलि प्रशासन सदर घटना दडपण्याचा प्रयत्न करत  असल्याचे यावरून दिसून येत आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार अपघातग्रस्त टँकरची वैधता समाप्त झाल्याची माहिती आहे. सद्या वेकोलि माजरी क्षेत्राअंतर्गत कोळसा खाणीत अनेक वाहनांची वैधता समाप्त झाली असून, अजूनही हे वाहन खाणीत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती या घटनेनंतर समोर आली आहे.