बल्लारपूर विधानसभा मुनगंटीवारांसाठी ‘डेंजर झोन’ !

58

लोकसभा निवडणुकीत केवळ ४४ मतदान केंद्रावर आघाडी

भाजपा पासून मतदार दुरावल्याने चिंता

अनेकश्वर मेश्राम
   विसापूर : विधानसभा क्षेत्राची पुनरर्चना २00९ झाली. त्यामुळे नव्याने बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आले. तेव्हापासून या क्षेत्राचे प्रतिनिधित्व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार करत आहे. त्यांनी यावर्षी चंद्रपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तिसऱ्यांदा लढविली. मात्र त्यांचा २ लाख ६0 हजार ४0६ मतांच्या फरकाने पराभव पत्कारावा लागला आहे. विशेष म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील एकूण 361 मतदान केंद्रांपैकी केवळ ४४ मतदान केंद्रावर त्यांना आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ‘डेंजर झोन’ मध्ये आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

.      चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिमा विकास पुरुष म्हणून आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह जिल्हास्तरावर त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती त्यांच्या प्रयत्नामुळे निर्माण झाल्या. सांस्कृतिक कार्य विभाग काय असतो, याची प्रचिती जिल्हाभरातील नागरिकांना त्यांच्या माध्यमातून झाली. मात्र लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांचे डोळे दिपवणारे कार्य मतदारांना भावलेच नाही. निवडणुकीत त्यांचे फासे उलटे फिरले. परिणामी त्यांना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचेकडून २ लाख ६0 हजार ४0६ मतांनी मात खावी लागली. त्यांच्या स्वतःच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात देखील ४८ हजार २00 मते ना. मुनगंटीवर यांना कमी मिळाली. भाजपासाठी हा फार मोठा चिंतनाचा विषय झाला आहे. संघटनात्मक बाबीत व राजकीय क्षेत्रात बलाढ्य व अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेवर हा मोठा आघात आहे.

.      लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदारांपैकी २ लाख ५ हजार ४५९ मतदारांनी मताधिकारांचा हक्क बजावला. यासाठी विधानसभा क्षेत्रात 361 मतदान केंद्रांची निर्मिती केली होती. यातील केवळ ४४ मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मतांची आघाडी मिळाल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तब्बल 314 मतदान केंद्रावर मताधिक्य घेतले आहे. ही मतदानांची प्रक्रिया आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कायम राहिल्यास भाजपासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. म्हणूनच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ‘डेंजर झोन’ मध्ये येण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहे.

.      बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा व चंद्रपूर तालुक्यातील ७९ असे एकूण 361 मतदान केंद्राचा समावेश आहे. या क्षेत्रात बल्लारपूर व मूल नगरपालिका, तर पोंभुर्णा नगरपंचायत आहे. या ठिकाणी भाजपाचे प्राब्लय आहे. बल्लारपूर नगरपालिका क्षेत्रातील एकूण ८८ मतदान केंद्रांपैकी केवळ ११ आणि मूल नगरपालिका क्षेत्रातील एकूण २२ मतदान केंद्रापैकी केवळ ४ मतदान केंद्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मतांची आघाडी मिळवून देणारे ठरले आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले विसापूर ग्रामपंचायत मधील १0 मतदान केंद्रापैकी केवळ एका मतदान केंद्रावर भाजपला मतांची आघाडी आहे. पोंभुर्णा व कोठारी येथे एकही मतदान केंद्र भाजपाच्या उमेदवाराला मतांची आघाडी मिळवून देऊ शकले नाही. याला कारणीभूत भाजपाच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपना असल्याची चर्चा मतदारांत केली जात आहे. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक बल्लारपूर विधानसभा क्षेत्र भाजपाच्या उमेदवारांसाठी ‘डेंजर झोन’ ठरण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारी वरून वर्तविली जात आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर भाजपचेच वर्चस्व                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून आजतागायत या क्षेत्रावर भाजपाचे वर्चस्व दिसून येत आहे .ही किमया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच साधली आहे. येथील २00९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी ८६ हजार १९६ मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा २४ हजार ७४६ मतांच्या फरकाने पराभव केला होता. यावेळी राहुल पुगलिया यांना ६१ हजार ४६0 मते मिळाली होती. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांचा ४3 हजार ६00 मतांनी पराभव केला.यामध्ये मुनगंटीवार यांना १ लाख 3 हजार ७१८ मते, तर मुलचंदानी यांना ६0 हजार ११८ मते मिळाली होती. २0१९ च्या विधानसभा निवडणुकीत येथे निवडून येण्यासाठी तीन उमेदवारात संघर्ष झाला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ८६ हजार मते घेऊन काँग्रेसचे उमेदवार डा. विश्वास झाडें यांचा 33 हजार २४0 मतांनी पराभव केला. डा. विश्वास झाडें यांना ५२ हजार ७६२ मते, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांना 39 हजार ९५८ मते मिळाली होती. तिन्ही विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची मतांची टक्केवारी अनुक्रमे ४९.७४, ५3.03 व ४२.९0 इतकी होती. या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवारांची मतांची टक्केवारी अनुक्रमे 3५.४७ ,30.७४ व २६.3२ इतकीच आहे. दर निवडणुकीत या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने उमेदवारात बदल केला. मात्र त्यांना विजया पर्यंत पोहचता आले नाही.