सोयाबीन बिज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी

37

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

चिमूर : मागील वर्षी खरीप हंगाम मध्ये सोयाबीन पिकावर झालेला मुळकुज, खोडकूज, चक्रीभुंगा, खोड माशी, पिवळा मोजैक इ. कीड व रोगाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी खरीप हंगामाची तयारी करताना शेतीची पूर्व मशागत करणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच पेरणी करताना पेरणीपूर्व बियाणाला बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

.        बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला बुरशीजन्य रोगासाठी बुरशीनाशक त्यानंतर रस शोषण करणाऱ्या किडीसाठी कीटकनाशक आणि त्यानंतर जमिनीमध्ये असलेले नत्र स्फुरद आणि पालाश याची उपलब्धता करून देण्यासाठी जिवाणू संघाची बीजप्रक्रिया करावी. किंवा संयुक्त कीटकनाशक व बुरशीनाशकाची आणि त्यानंतर जिवाणू संघाची बीज प्रक्रिया करावी. दुबार पेरणी व दुबार खर्च टाळण्यासाठी व वेळेवर पेरणी होण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करूनच बियाण्याची पेरणी करत, त्यानंतर सोयाबीन पेरणी करताना बीबीएफ पद्धतीने किंवा बेडवर टोकन पद्धतीने पेरणी करावी. मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर पेरणीची घाई न करता दोन ते तीन दिवसांमध्ये 75 ते 100 मिलिमीटर पाऊस म्हणजेच जमिनीमध्ये सहा इंच ओलावा असल्यावरच पेरणी करावी. तसेच सोयाबीन पिकांमध्ये अष्टसूत्री पद्धतीचा वापर करावा.

.       सोयाबीन व कापूस पिकाच्या वाणाची निवड व लागवड पद्धती इत्यादी सोबतच कृषी केंद्रामधून बियाणे, खते खरेदी करते वेळेस घ्यावयाची काळजी, निंबोळी जमा करणे व त्याचा वापर करणे. एम. आर. जी येस अंतर्गत फळबाग लागवड करणे बांबू लागवड करणे तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध बाबींसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

.        यावेळी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक आर. एच. चव्हाण, कृषी सहाय्यक डी. व्हि. मापारी त्याचबरोबर बोथली ग्रामपंचायतचे सरपंच विनोद देठे, उपसरपंच देविदास नन्नावरे, पोलीस पाटील आनंद थुटे शेतकरी मित्र कपिल थुटे तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.