आदिम कोलाम-माडिया तरुणांच्या स्वप्नांना बळ !

39

जागृत संस्थेतर्फे ‘जाणीव २०२४’ शिबीर

 उच्चशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, हक्क, अधिकारांवर मंथन

चंद्रपूर : देशात एकूण ७५ आदिम जनजातीपैकी महाराष्ट्रात कोलाम, कातकरी आणि माडिया या तीन आदिम जनजाती आहेत. त्यात नक्षल्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आदिम माडिया व चंद्रपूर जिल्ह्यात आदिम कोलाम समुदायाचे वास्तव्य आहे. जल-जंगल-जमिनीशी नाते टिकवून, आपल्या प्रथा-परंपरा-संस्कृतीशी प्रामाणिक राहून या समुदायांची वाटचाल सुरु आहे, या समुदायातील नव्या पिढीत सामाजिक सजगता, शैक्षणिक जागृती व नेतृत्व विकास यास चालना देण्याच्या हेतूने जागृत संस्थेच्या माध्यमातून तीन दिवसीय पहिले आदिम युवा नेतृत्व विकास शिबीर ‘जाणीव – २०२४’ मोरवा येथील छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालयात नुकतेच पार पडले. या शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील माडिया व जिवती तालुक्यातील कोलाम समुदायातील ५० युवक-युवती सहभागी झाले.

.       या तीन दिवसीय शिबिरात डॉ.दिलीप चौधरी, नागपूरचे ॲड. सचिन मेकाले, युवा प्रश्नांचे अभ्यासक सतिश गिरसावळे, माडिया समाजातील पहिले वकिल ॲड. लालसू नोगोटी, अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोरचे प्रो. नीरज हातेकर, प्रसिद्ध दिग्दर्शिका प्राचार्य डॉ. जयश्री कापसे, चेव्हनिंग स्काॅलर ॲड. दीपक चटप, समुपदेशक नागेश मादेशी, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते बंडू धोत्रे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बाळू राठोड, सामाजिक कार्यकर्ते चिन्ना महाका, किसन आत्राम यांनी मार्गदर्शन केले.

.       ‘जाणीव जगण्याची, उच्चशिक्षणाची, समाज परिवर्तनाची’ या थीमवर आयोजित शिबीरात शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, आदिवासींचे कायदे, हक्क, अधिकार, संस्कृती यावर विचारमंथन करण्यात आले. शिबीराच्या आयोजनात जागृत संस्थेचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर, वर्षा कोडापे, राम चौधरी, राजू काळंगा, सुरेश कोडापे, भीमराव कोडापे, बुकलू लेखामी, नितेश वाघाडे यांनी परिश्रम घेतले. राज्यात आदिम समाजातील कोलाम व माडिया समाजातील युवकांसाठीचे हे पहिलेच शिबीर ठरले हे विशेष!

नक्षलग्रस्त भागातील मुलांचा शिक्षणाचा संकल्प                                                                                                                                                                                                                                  चंद्रपूर येथील जागृत संस्था ही चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आदिम आदिवासी समुदायासोबत त्यांचे हक्क, कायदेविषयक संविधानिक जागरूकता, शिक्षण, संशोधन व ग्रमीण विकास यावर जमिनीस्तरावर जनजागृतीचे कार्य करते. पहिल्यांदाच आयोजित जाणीव शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभावित भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, कुवाकोडी येथूनही युवक सहभागी झाली. जिवतीतील अतिदुर्गम भागातून कोलाम समुदायातील मुले सहभागी झाली. शिक्षण-संस्कृतीचे आदान प्रदान दोन्ही आदिम समुदायातील युवकांनी करुन उच्चशिक्षणातून समाज परिवर्तनाचा संकल्प केला.