येरगाव येथील जी. प. शाळा चालते शिक्षकाविना

79

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण ?

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा येरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षक आणि शिक्षिका यांना काही दिवसापूर्वी निलंबित करण्यात आले. तेव्हापासून या शाळेत कोणत्याही शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न येथील पालकांनी केला असून ही शाळा शिक्षकवीणा झाली असल्याने या शाळेत त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

.      येरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १ ते ४ वर्ग सुरू असून या शाळेत मुख्याध्यापक म्हणून सागर शंभरकर आणि सहाय्यक शिक्षिका संगीता कुंभारे हे दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र मागील काही दिवसांपासून मुख्याध्यापक शंभरकर आणि शिक्षिका कुंभारे यांचे एकमेकांशी पटत नव्हते. दोन्ही शिक्षकांनी आपापल्या परीने एकामेकांची वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यामुळे सिंदेवाही पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी दोन्ही शिक्षकांचे इतरत्र तात्पुरते समायोजन केले. मात्र आमदार महोदय यांचे तोंडी सूचनेनुसार शिक्षिका संगीता कुंभारे यांचे समायोजन रद्ध केले. आणि मुख्याध्यापक शंभरकर यांना सिंदेवाही येथील हेटी शाळा येथे पाठविण्यात आले. तेव्हापासून शिक्षिका कुंभारे ह्या एकच शिक्षिका येरगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. मात्र काही दिवसातच मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी वरील दोन्ही शिक्षकांना निलंबित केले. त्यामुळे येरगाव शाळेत कोणीच शिक्षक उरले नाही.
सदर शाळेत कोणतेही शिक्षक नसल्याने विद्यार्थांना शिकवणार कोण? असा प्रश्न घेऊन पालकांनी आरडाओरड सुरू केली. मात्र गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी या शाळेकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

मागील काही दिवसांपूर्वी येरगाव शाळेतील कार्यरत शिक्षिका कुंभारे ह्या निलंबित झाल्या असल्याने शाळेत कोणतेही शिक्षक उरले नाही. मात्र पंचायत समितीला शिक्षकांची कमतरता असल्याने सदर शाळेत कोणताही शिक्षक पाठविला नाही. परंतु विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषयतज्ञ पाठविण्यात येत आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               किशोर पिसे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही.