पक्षांसाठी घराच्या छतावर ओंजळभर पाणी ठेवणे आवश्यक

40

महेंद्र कोवले

  सिंदेवाही : नुकतेच वसंत ऋतू ला सुरुवात झाली असून पानगळीच्या मोसमासह दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढायला लागली आहे. उन्हाने लाहीलाही करून सोडणारा उन्हाळा ऋतू वैदर्भीयांसाठी नेहमीचाच परिचयाचा झाला आहे. या असह्य उन्हापासून प्रत्येकजण आपापल्या परीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र मुक्या प्राणी पक्षांचे काय ? असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. नेमका हाच प्रश्न मनात घेऊन प्राणी, आणि पक्षांकरिता मूठभर दाने, आणि ओंजळभर पाणी, दारापुढे ठेवणे आवश्यक झाले आहे.

.      मानवाचे कळत नकळत निसर्गाकडे होणारे दुर्लक्ष, आणि त्यामुळे दिवसेंदिवस पावसाचे कमी झालेले प्रमाण याचा त्रास मनुष्यासोबतच मुक्या प्राणी, पक्षांना होतोय, याची जाणीव आपल्या सर्वांना असणे आवश्यक आहे. पक्षी उडत असल्याने त्याची पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी त्याला मुबलक पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. चांगले पाणी मिळाले तर त्यांची पचनसंस्था उत्तम राहते. याकाळात बऱ्याचवेळा पक्षांना ग्लानी येऊन खाली पाडण्याचे प्रकारही घडतात. कोणत्याही ऋतू मध्ये , विशेषतः उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झाडाखाली पाणथळे बनवावेत.

.      प्रत्येक नागरिकांनी आपल्याघरापुढे पक्षांकरीता मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. तसेच त्यांना खायला नैसर्गिक अन्न ठेवणे गरजेचे आहे. या पृथ्वी तलावावर मानवाला राहण्याचा जेवढा अधिकार आहे. तेवढाच अधिकार प्रत्येक सजीव जातीला आहे. तसेही आपण दैनंदिन जीवनात पाण्याचा अपव्यय करीत असतोच. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा जपून वापर करावा. तसेच खाली सांडणारे पाणी वाचवून किमान एक ग्लास पाणी प्रत्येकाने आपल्या घरापुढे किंवा घराच्या छतावर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या चिऊताईसह, अनेक पक्षी ते पाणी पिऊन आपली तृष्णा भागवू शकतील.