दारूबंदी साठी महिलांचा जन आक्रोश मोर्चा

29

◾ मोहाळी (नलेश्वर) येथील अवैध्य दारू विक्रेत्यांनी केला कहर

सिंदेवाही : पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मोहाळी (नलेश्वर) येथील अवैध्य दारू विक्रेत्यांनी कहर केला असून दारू विक्रेत्यांच्या जाचाला कंटाळून अखेर गावातील महिलांनी पोलीस स्टेशन ला तर धडक देत दारूबंदीची मागणी करीत गावात जन आक्रोश मोर्चा काढला.

.          चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाली असताना महाविकास आघाडीचे सरकार येताच पुन्हा जिल्ह्यातील सर्व परवानाधारक दारू दुकाने सुरू झाली. आणि त्यामुळे ग्रामीण भागातील अवैध्य दारू विक्रेते सैराट झाले. सिंदेवाही तालुक्यात अवैध्य दारू विक्रेत्यांचा कहर सुरू असून पंधरा दिवसापूर्वी याच तालुक्यातील लाडबोरी येथील महिलांनी दारूबंदी साठी तहसील कार्यालय सह पोलीस स्टेशन वर धडक देऊन दारूबंदीची मागणी लावून धरली असताना त्यांचे पाठोपाठ मोहाळी ( नलेश्वर) येथील महिलांनी दारूबंदीसाठी कंबर कसली असून पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे धडक देत नुकताच गावातील प्रमुख मार्गानें शेकडो महिलांनी जन आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.

.          ग्राम पंचायत कार्यालय मोहाळी ( नलेश्वर) अंतर्गत मागील अनेक दिवसापासून १२ ते १५ अवैध्य दारू विक्रेते दारू विक्री करीत आहेत. यामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था, धोक्यात आली आहे. महाविद्यालयीन युवकांपासून तर शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत दारूच्या आहारी गेले आहेत. महिलांना रस्त्याने येताना जाताना मानसिक, शारीरिक त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून मोहाळी येथील महिलांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करून गावात शांतता प्रस्थापित करावी. अशी मागणी करीत सिंदेवाही पोलीस स्टेशन वर धडक दिली आहे. व त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने जन आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.