वायगाव नाल्यात मृतावस्थेत आढळली वाघीण

37

वरोरा तालुक्यातील घटना : वाघाच्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता वाढली

चंद्रपुर

.       तालुक्यातील खांबाडा ते मुरदगाव रस्त्यालगत असलेल्या वायगाव नाल्यात अंदाजे तीन वर्ष वय असलेल्या वाघिणीचा मृतदेह रविवारी, 10 डिसेंबर ला दुपारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दिवसेंदिवस वाघाच्या मृत्युच्या घटनेत वाढ होतांना दिसत असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

.       वरोरा तालुक्यातील मुरदगाव, वायगाव मार्गांवर असलेल्या वायगाव नाल्यात एक वाघ मृतावस्थेत असल्याचे नागरिकांना दिसून आले. ही घटना गावात माहित होताच वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी वनविभागाला देताच वनपरिक्षेत्र कार्यालयातील चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृत वाघिणीला ताब्यात घेतले.

.       यावेळी वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, अध्यक्ष ईको-प्रो संस्था तथा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनीधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य मुकेश भांदककर, वनसंरक्षक नागपुर यांचे प्रतिनिधी, अपास संस्थेचे विशाल मोरे वन्यजीव प्रेमी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे व वनकर्मचारी यांनी मोका पाहणी करुन मृत वाघाचे (मादी) मोका पंचनामा केला. व वाघाचे शवविच्छेदन करण्याकरीता टीटीसी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे चंद्रपूर, सहाय्यक वनसंरक्षक घनश्याम नायगमकर, चंद्रपूर (अतिरिक्त) यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे, वरोरा व क्षे.स. डि. बी. चांभारे टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस.डी. खोब्रागडे क्षे.स. वरोरा, जी. डी. केजकर वनरक्षक टेमुर्डा, एन. के. करकाडे वनरक्षक केम, ए. ई. नेवारे, वनरक्षक आजनगाव करीत आहे.