Home चंद्रपुर जिल्हा विशेष ऐन खरिपाच्या तोंडावर चंद्रपुरात तीव्र डिझेल टंचाई

ऐन खरिपाच्या तोंडावर चंद्रपुरात तीव्र डिझेल टंचाई

16

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कोटा व विशेष वितरण प्रणाली सुरू करा – खा. प्रतिभा धानोरकर

इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी तेल कंपन्यांना तातडीने निर्देश देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी

शेतीची कामे खोळंबल्याने बळीराजा हवालदिल

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. यामुळे जिल्ह्यात तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली असून, सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी बांधवांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले असून, इंधनाअभावी वाहतूक व्यवस्थाही कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.

.      या गंभीर समस्येची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची आग्रही मागणी केली आहे.

ऐन हंगामात शेतीची कामे खोळंबली
सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. शेतीची मशागत, नांगरणी व पेरणी पूर्व कामांसाठी ट्रॅक्टर्स व इतर कृषी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, डिझेल उपलब्ध नसल्याने शेतीची ही कामे पूर्णतः खोळंबली आहेत. ऐन हंगामाच्या तोंडावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर पंपावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्या वेळेचा आणि श्रमाचा मोठा अपव्यय होत असून, जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे.

स्वतंत्र कोटा आणि विशेष वितरण प्रणालीची मागणी
शेतकऱ्यांची ही वाढती अडचण आणि शेतीचा हंगाम लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी जिल्ह्यातील ठराविक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांकरिता डिझेलचा स्वतंत्र राखीव कोटा ठेवण्यात यावा किंवा त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी बांधवांना प्राधान्याने डिझेल मिळून त्यांना शेतीची कामे वेळेत पूर्ण करता येतील.

प्रशासकीय आदेश निर्गमित करण्याची अपेक्षा
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याला होणारा इंधन पुरवठा सुरळीत करण्याबाबत संबंधित तेल कंपन्यांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी विनंती खासदार धानोरकर यांनी केली आहे. जोपर्यंत इंधन पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी विशेष इंधन वितरण प्रणाली कार्यान्वित करावी. पेरणीचा हंगाम हातातून जाण्यापूर्वी या लोकहितकारी मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत, अशी तीव्र अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!