आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला यश
किडनी विक्रीच्या वेदनादायी प्रकरणातील पीडित कुटुंबाला मोठा आधार
१९ तारखेला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेशाचे वितरण
चंद्रपूर : सावकारी पाशात अडकून कर्ज फेडण्यासाठी चक्क आपली किडनी विकावी लागलेल्या आणि परदेशात बंधुआ मजूर म्हणून छळ सोसाव्या लागलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रोशन कुळे यांच्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि संवेदनशील पाठपुराव्याला मोठे यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोशन कुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपयांची विशेष आर्थिक मदत मंजूर केली आहे.
कर्जाचा डोंगर आणि किडनी विक्रीची नामुष्की
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबावर सावकारी कर्जामुळे मोठे संकट ओढवले होते. त्यांची शेतजमीन सावकारांकडे गहाण पडली होती आणि कर्जाच्या व्याजाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत होता. या आर्थिक विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी रोशन कुळे यांना स्वतःची किडनी विकण्यासारख्या अत्यंत वेदनादायी घटनेला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर, त्यांना लाओसमध्ये नेऊन तिथे बंधुआ मजूर म्हणून त्यांचा छळ करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे कुळे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.
मुनगंटीवारांचा ‘देवदूत’ म्हणून पुढाकार
या भीषण संकटाच्या काळात रोशन कुळे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली. कुळे कुटुंबाची कैफियत ऐकल्यानंतर आ. मुनगंटीवार कमालीचे हेलावले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि या पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची आग्रही मागणी केली.
सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मदतीचा निर्णय
केवळ पत्रव्यवहार न थांबवता आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने शासनासमोर मांडल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लक्ष रुपयांच्या मदतीवर स्वाक्षरी केली. या मदतीमुळे सावकारीच्या ओझ्याखाली दबलेल्या कुळे कुटुंबाला आता पुन्हा नव्याने उभे राहण्याची उमेद मिळाली आहे.
१९ तारखेला होणार मदतीचे हस्तांतरण
या मंजूर झालेल्या ५ लक्ष रुपयांचा धनादेश येत्या १९ तारखेला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कुळे कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू
“आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात आमचे दुःख समजून घेत मदतीसाठी धावून येणारे नेतृत्व म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे आम्हाला हा मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे,” अशा शब्दांत कुळे कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तत्परतेने मदत दिल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत.


