ट्रान्सफॉर्मरवर मृतावस्थेत पडून असलेल्या बंदराची शिकार करताना बिबट्याचा शॉक लागून मृत्यू

33
  • महावितरणच्या हलगर्जीपणा बीतला बिबट्याच्या जिवावर
  • सिंदेवाहीतील भेंडाळा शेत शिवारातील घटना

सिंदेवाही 

.            तहसील कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या लाडबोरी साजा क्रमांक ८ मधील मौजा भेंडाळा (खातगाव) शेत शिवारात एका बंदराच्या शिकरीच्या नादात लागलेला बिबट विद्युत ट्रान्सफॉर्मवर अडकला. आणि त्यामध्ये त्याला विद्युत शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून आधीच ट्रान्सफॉर्मर मध्ये बंदर मरून पडला असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने पुन्हा बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली.

.            सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सिंदेवाही उपक्षेत्र नियतक्षेत्र डोंगरगाव मधील भेंडाळा गट क्र. १२ कमलाबाई पेंदाम यांचे शेत शिवारात ११ केव्ही डिस्ट्रिब्युशन लाईन जिवंत विद्युत ट्रान्सफॉर्मर असून शुक्रवारच्या रात्री त्यावर एक बंदर मृत अवस्थेत वरील शेतकऱ्यांना आढळला. त्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मात्र त्या अधिकाऱ्याने या याकडे कानाडोळा केला. नंतर त्याच ठिकाणी बिबट मादी आली. बिबट्याला ट्रान्सफॉर्मर वर बंदर दिसला. त्यामुळे बिबट्याने त्या बंदराची शिकार करण्याच्या उद्देशाने ट्रान्सफॉर्मर वर चढला. मात्र त्यालाही विद्युत करंट लागून त्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरण अधिकऱ्यानी अगोदरच ट्रान्सफॉर्मर वरून बंदर काढला असता. तर बिबट्याचा मृत्यू झाला नसता. अशी चर्चा भेंडाळा येथील नागरिक करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती वनविभागाला मिळताच त्यांची सर्व चमू घटनास्थळी दाखल झाली. आणि घटनेची पाहणी केली असता एक बिबट आणि एक बंदर मृत अवस्थेत आदळले. त्याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि वीजवितरण कंपनीला देण्यात आली.

.            त्यानुसार सर्व अधिकारी घटनास्थळी पोहचले. सर्वांच्या समक्ष मृत बिबट्याचे निरीक्षण केले असता सर्व अवयव शाबूत असल्याने कोणताच घातपात झाला नसल्याची खात्री झाली. व जिवंत विद्युत प्रवाहाने दोन्ही प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. मध्यवर्ती काष्ट भांडार सिंदेवाही येथे डॉ.विनोद सुरपाम व डॉ.शालिनी लोंढे यांनी वरील प्राण्यांचे शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणी साठी काही नमुने घेऊन बाकी सर्व शरीर सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व पंचासमक्ष जाळण्यात आले.