Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर जिल्हा ‘ड्रग्जमुक्त’ करण्यासाठी प्रशासनाची कसली कंबर

चंद्रपूर जिल्हा ‘ड्रग्जमुक्त’ करण्यासाठी प्रशासनाची कसली कंबर

10

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कृती आराखडा

अमली पदार्थ विक्री आणि साठवणुकीवर कडक वॉच

शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसह बंद कारखान्यांची होणार झाडाझडती

चंद्रपूर : जिल्ह्यात अंमली पदार्थांचे वाढते धोके ओळखून जिल्हा प्रशासनाने याविरोधात युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी मैदानात उतरण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात कोठेही अमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वापर होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

विभागांनुसार निश्चित केलेली कार्यपद्धती
अमली पदार्थांविरोधातील या लढ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला स्वतंत्र जबाबदारी सोपवली आहे. शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केवळ देखरेखच न ठेवता निबंध स्पर्धा, रॅली आणि पथनाट्यांद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्स आणि संशयास्पद कारखान्यांची अचानक तपासणी करून औषधांच्या नावाखाली होणारी अमली पदार्थांची विक्री रोखण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमध्ये छुप्या पद्धतीने होणारी गांजा किंवा खसखसची लागवड शोधण्याची जबाबदारी कृषी विभागावर सोपवण्यात आली आहे. आरोग्य विभागाने अंमली पदार्थ सेवन केलेले रुग्ण आढळल्यास त्यांची माहिती तातडीने पोलिसांना देणे बंधनकारक केले आहे. यासोबतच, टपाल विभाग, रेल्वे आणि प्रादेशिक परिवहन विभागाने बाहेरून येणाऱ्या संशयास्पद पार्सलची व प्रवाशांच्या सामानाची कडक तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाला खबऱ्यांचे जाळे विस्तारून एमआयडीसीमधील बंद कारखाने आणि खासगी कुरिअर कंपन्यांवर करडी नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

तरुण पिढीला वाचवण्यासाठी विशेष पाऊल
बैठकीत जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, १६ ते १८ वयोगटातील मुले या व्यसनाकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे. तसेच तेलंगणासारख्या सीमावर्ती राज्यांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे.

.        या मोहिमेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट उपटून टाकण्याचा प्रशासनाचा मानस आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!