आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
नागपूर येथे ‘युवा वॉरियर्स’ कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी तरुणांना संघटित होण्याचे आवाहन
चंद्रपूर : “राजकारण म्हणजे केवळ सत्ताप्राप्ती किंवा निवडणूक जिंकणे नव्हे. १०० मार्कांच्या आयुष्याच्या पेपरमध्ये निवडणूक हा केवळ ५ मार्कांचा प्रश्न आहे, उर्वरित ९५ टक्के प्रश्न हे लोकसेवेचे आणि राष्ट्रनिर्माणाचे आहेत. आपल्याला केवळ सत्ता मिळवायची नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील २०४७ चा शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे. त्यासाठी ‘गरिबांच्या सन्मानासाठी युवा वॉरियर्स मैदानात’ हा मंत्र जपत तरुणांनी स्वतःला झोकून द्यावे,” असे ओजस्वी आवाहन माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
. नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अटलजींच्या विचारांची शिदोरी आणि सत्तेचा दृष्टिकोन
भाषणाच्या सुरुवातीला मुनगंटीवार यांनी भाजपच्या ध्येयधोरणांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या स्थापनेचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी श्रद्धेय अटलजींनी ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ हा विश्वास दिला होता. पण त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वाचा धडा दिला होता की, सत्ता हे आपल्यासाठी ‘साध्य’ नाही तर ते लोकसेवेचे एक ‘साधन’ आहे. आपल्याला केवळ विकसित भारत नकोय, तर संस्कारित भारत हवा आहे.”
प्रत्येक वॉर्डात ३० युवा वॉरियर्सचा संकल्प
नागपूरमधील १५४ वॉर्डांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण ४,६२० युवा वॉरियर्स तयार करण्याचा जो संकल्प संघटनेने केला आहे, त्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. १७ ते २५ वयोगटातील तरुणांना संघटित करून ही नवीन शक्ती पक्षाच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “उठ तरुणा जागा हो… विकसित संस्कारित भारताचा धागा हो,” असे आवाहन करत त्यांनी ही चळवळ केवळ शहरापुरती मर्यादित न ठेवता झोपडपट्टीतील आणि गरीब कुटुंबातील तरुणांनाही सोबत घेण्याचे निर्देश दिले.
![]()
भयमुक्त आणि समृद्ध भारतासाठी ‘मिशन २०४७’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला २०४७ चा भारत हा विचार पूर्ण करण्यासाठी तरुणांची सक्रियता अनिवार्य आहे. “जेव्हा तरुण इच्छाशक्तीच्या जोरावर उभा राहतो, तेव्हाच भयमुक्त, भूकमुक्त, बेरोजगारीमुक्त आणि दहशतमुक्त भारताचे स्वप्न साकार होणे शक्य आहे. काम करताना पदाचा मोह न धरता कामाची भावना महत्त्वाची ठेवा,” असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
नागपूर – उर्जेचे केंद्र
नागपूर हे देशाला नेहमीच ऊर्जा देणारे केंद्र राहिले आहे. येथील युवा शक्ती आपल्या कार्यातून संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण करेल. भाजपमध्ये येणाऱ्या कोट्यवधी तरुणांमध्ये यातून नवचैतन्य निर्माण होईल, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला नागपूर महानगर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, श्रीकांत आगलावे, विष्णू चांगदे, नागपूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे, शहर युवा वॉरियर प्रमुख इशान जैन, रितेश गावंडे, संजय अडसड, अथर्व त्रिवेदी आणि बादल राऊत यांसह मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी उपस्थित होते.


