Home चंद्रपुर जिल्हा विशेष पलटी ट्रॅक्टर सरळ करताना विद्युत तारेचा स्पर्श

पलटी ट्रॅक्टर सरळ करताना विद्युत तारेचा स्पर्श

15

२६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

भद्रावती तालुक्यातील आष्टा परिसरातील घटना

भद्रावती : तालुक्यातील आष्टा परिसरात तलाव खोलीकरणाच्या कामादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली आहे. पलटी झालेला ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतला असून, जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने अक्षय शामदेव कापटे (२६), रा. आष्टा वडाळा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.

.     मिळालेल्या माहितीनुसार, आष्टा येथे सध्या तलाव खोलीकरणाचे काम सुरू आहे. या कामातून निघालेली माती शेतात वाहून नेण्याचे काम ट्रॅक्टरद्वारे केले जात होते. यादरम्यान एक ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. हा पलटी झालेला ट्रॅक्टर सरळ करण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरची मदत घेण्यात आली. दोन्ही ट्रॅक्टरला जोडण्यासाठी ११ एमएमच्या लोखंडी सळाखीचा (टोचन) वापर करण्यात आला होता.

.      ट्रॅक्टर ओढत असताना अचानक सळाखीवर अधिक दाब आला आणि ती सळाख अनपेक्षितपणे उभी झाली. दुर्दैवाने, त्याच वेळी सळाखीचा वरून गेलेल्या उच्च दाबाच्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाला. या सळाखीद्वारे विद्युत प्रवाह संपूर्ण ट्रॅक्टरमध्ये उतरल्याने अक्षय कापटे याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

.     या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून कामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षयच्या निधनाने आष्टा वडाळा गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!