Home सामाजिक चंद्रपूर जिल्ह्यासाठी २०२६-२७ चा विकास आराखडा तयार

चंद्रपूर जिल्ह्यासाठी २०२६-२७ चा विकास आराखडा तयार

13

सीमावर्ती गावे १००% सौर ऊर्जेवर करणार – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

शेतकऱ्यांना कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत

जिवती आकांक्षित तालुक्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर

चंद्रपूर : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर नियतव्यय, विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणारी विकासकामे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विशेष भर दिला आहे. नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

.      या बैठकीला आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, कुशाग्र पाठक, योगेश वाघाये, आनंद रेड्डी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुंभरे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

नियोजनासाठी कालमर्यादा निश्चित
पालकमंत्री डॉ. वुईके यांनी यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले की, एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत सर्व विभागांनी आपले प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करावेत. या प्रस्तावांमध्ये चालू आर्थिक वर्षात कोणती विकासकामे केली जाणार आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशी होणार, याचा सविस्तर आराखडा असणे अनिवार्य आहे. केवळ पारंपरिक कामे न करता जिल्ह्यात लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सीमावर्ती गावे होणार सौरऊर्जेवर १०० टक्के स्वयंपूर्ण
ऊर्जा क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेताना पालकमंत्र्यांनी महावितरणला सूचना दिल्या की, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गावांमध्ये वीज समस्या सोडवण्यासाठी ही गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर (Solar Energy) करावीत. यामुळे दुर्गम भागातील वीज प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.

शेतकरी कर्जवाटपावरून बँकांना तंबी
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, “कर्ज वितरणाबाबत बँकांची कोणतीही तक्रार येता कामा नये. बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी (LDM) ठोस नियोजन करावे.” याच संदर्भात आमदार देवराव भोंगळे यांनी लक्ष वेधले की, जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, त्यांना बँकांनी तातडीने नवीन कर्ज दिले पाहिजे, मात्र सध्या बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यावर पालकमंत्र्यांनी बँकांना कडक सूचना देण्याचे निर्देश दिले.

आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रावर विशेष लक्ष

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा साठा ठेवावा. रुग्णालयातील सर्व यंत्रसामग्री अद्ययावत असावी. रुग्णांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि शौचालयांची स्वच्छता चोख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, जिवती या आकांक्षित तालुक्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन मूलभूत बाबींवर प्रशासनाने विशेष ‘फोकस’ करावा, चंद्रपूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी शहरात उत्तम दर्जाच्या अभ्यासिका (Libraries) तयार कराव्या. तसेच अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि शौचालयांची सोय प्राधान्याने करावी, क्रीडा विभागाने केवळ तात्पुरती कामे न करता खेळाडूंसाठी दीर्घकाळ टिकतील अशा सुविधा निर्माण कराव्या. आमदार भोंगळे यांच्या मागणीनुसार, तालुका क्रीडा संकुलांमध्ये कुस्ती आणि कबड्डीसाठी ‘मॅट’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

रस्ते विकासासाठी निधीची हमी
ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी ज्या गावांना रस्त्यांची अत्यंत गरज आहे, अशा गावांचे रस्ते त्वरित पूर्ण करावेत, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रगतीबाबत सादरीकरण केले.

error: Content is protected !!