Home सामाजिक ताडोबा हे निसर्गाचे वरदान

ताडोबा हे निसर्गाचे वरदान

7

आगरझरी–मोहर्लीला पर्यावरणीय ‘मॉडेल व्हिलेज’ बनवू

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

पद्मापूर प्रवेशद्वाराचे लोकार्पण; ताडोबा पर्यटन विकासाला नवी गती

रस्ते, सौंदर्यीकरण आणि स्थानिक रोजगाराला प्राधान्य देत ताडोबाला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेण्याचा संकल्प

चंद्रपूर : “ताडोबा हे निसर्गाचे वरदान असून आगरझरी-मोहर्लीला पर्यावरणीय ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पद्मापूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे अधिकृत उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ताडोबा पर्यटन विकास, रस्ते, सौंदर्यीकरण आणि स्थानिकांना रोजगारनिर्मिती यावर भर देत ताडोबाला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून अधिक भक्कम स्थान मिळवून देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग आणि ५० पर्यटन स्थळांत समावेशासाठी प्रयत्न
आ. मुनगंटीवार म्हणाले की, ताडोबा ही निसर्गाची मोठी देणगी असून, वनमंत्री असताना या भागाचा विकास व्हावा यासाठी जीव ओतून काम केले. ताडोबा हे पर्यटन क्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे यासाठी ताडोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामध्ये सहा विश्वसुंदरी सहभागी झाल्या आणि त्यामुळे ताडोबाची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली. आता केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्र्यांना ताडोबाचा देशातील ५० प्रमुख आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आली आहे. “जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. वाघ हा पराक्रमाचे प्रतीक असून, ‘वाघांच्या जिल्ह्याचा’ आवाज कुठेही कमी पडू दिला जाणार नाही; विधानसभेतही ही गर्जना कायम राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१ कोटी ८५ लाखांचे सौंदर्यीकरण आणि दर्जेदार काम
आगरझरी गावात रस्त्याच्या बाजूचे सौंदर्यीकरण करण्यासाठी १ कोटी ८५ लाख ६२ हजार ८४७ रुपयांचे काम करण्यात आले आहे. यामुळे जंगलातून प्रवास करताना पर्यटकांना झाडांवरील बिबट्या, विविध पक्षी, फुलपाखरे आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येणार आहे. कमी खर्चात दर्जेदार काम पूर्ण करून ताडोबाच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या संबंधित कंत्राटदारांचे आणि विप्लोवराज सिंघवी यांचे आ. मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले. अशा गुणवत्तापूर्ण कामांमुळे ताडोबाची ओळख अधिक भव्य आणि आकर्षक बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक रोजगार आणि वनक्षेत्राचे महत्त्व
आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, आज अनेकांच्या हाताला रोजगार मिळण्यामागे वाघ आणि ताडोबा हे प्रमुख कारण आहे. रिसॉर्ट, हॉटेल, जिप्सी आणि गाईड या क्षेत्रांमध्येही अधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे १७२५ चौरस किलोमीटर असून, ते जपणे गरजेचे आहे. २०१४ नंतर येथे मोहर्ली गेट, गावांतील अंतर्गत रस्ते, बटरफ्लाय गार्डन यांसारखे अनेक विकास प्रकल्प राबविण्यात आले. नवीन ताडोबा विकसित करायचा असेल, तर महाराष्ट्राचे २३ वर्षांचे संपूर्ण बजेट खर्च करावे लागेल, इतकी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे.

पुढील ५ वर्षांचा विकास आराखडा
पुढील पाच वर्षांत आगरझरी आणि मोहर्ली ही गावे उत्कृष्ट पर्यावरणीय मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करण्यात येतील. यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींसोबत कार्यशाळा घेऊन पुढील विकास आराखडा तयार केला जाईल. वाघांचे संरक्षण करणाऱ्या स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना, आदिवासी समाजाला आणि नारीशक्तीला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ताडोबा हे ‘स्मार्ट आणि सुंदर’ पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

कार्यक्रमाची उपस्थिती
या कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, उपकार्यकारी अभियंता विवेक अंबुले, शहर उपाध्यक्ष रामपाल सिंग, माजी जि. प. सदस्य गौतम निमगडे, माजी सभापती रोशनी खान, सुरेखा थोरात, अजय सरकार, मनोज सिंघवी, श्रीनिवास जंगम, मोहर्ली सरपंच सुनीता कातकर, चोरगाव सरपंच तृणाली धंदरे यांच्यासह ग्रामस्थ व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!