वनोजा ग्रा. प. चे ग्रामसेवक तथा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश खरवडे निलंबित

41

वरोरा 

.           तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक तथा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश खरवडे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबर च्या आदेशान्वये जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. सदर आदेश आज सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी वरोरा पंचायत समितीला प्राप्त झाल्यानंतर खरवडे यांना कार्यमुक्त करण्यात आले असून निलंबन काळात त्यांना राजुरा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.

.           वरोरा तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक प्रकाश खरवडे हे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांनी ग्रामसेवकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमीच आंदोलन केली असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तशा तक्रारी त्यांनी अनेकदा शासन दरबारी केल्या आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन छेडले होते. त्यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरोरा पंचायत समितीला आले होते. त्यांनी आंदोलक ग्रामसेवकांना समजविण्याचा व आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी प्रयत्न केला . तसेच ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष आणि सचिव यांच्या सोबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची मागणी केली होती. परंतु सदर मागणीला ग्रामसेवक युनियनने दाद दिली नाही. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनोजा ग्रामपंचायत ची चौकशी करण्याचे आदेश वरोरा पंचायत समितीला बजावले. यानंतर विस्तार अधिकाऱ्यामार्फत वनोजा ग्रामपंचायतची चौकशी करण्यात आली. तेव्हा कामात अनियमितता असल्याचा ठपका प्राथमिक चौकशीत ठेवण्यात आला. सदर चौकशी अहवाल एप्रिल २०२३ रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर ला सादर झाला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी ग्रामपंचायत कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवून ग्रामसेवक प्रकाश खरवडे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबरच्या एका पत्राद्वारे बजावले. सदर आदेश आज सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी वरोरा पंचायत समितीला प्राप्त झाले आणि त्यानुसार पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकाश खरवडे यांना कार्यमुक्त केले. निलंबन काळात त्यांना राजुरा पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे. प्रकाश खरवडे यांच्यावरील या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्यात प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे.

आमरण उपोषण करणार – खरवडे                                                                                                                      ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष असल्याने व वेळोवेळी आंदोलन केल्याने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानेच आपल्याला टार्गेट केले जात असून आकसापोटी केवळ माझ्याच ग्रामपंचायती चौकशी करण्याचे आदेश सदस्य किंवा ग्रामस्थांची कोणतीही तक्रार नसताना मुख्य कार्य उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. ही एक प्रकारे दडपशाही असून याविरुद्ध ग्रामसेवक युनियन जिल्हाभर नव्हे तर पूर्ण राज्यभर आंदोलन करणार असून आपण स्वतः या अन्यायाविरुद्ध आमरण उपोषण करणार असल्याचे प्रकाश खरवडे यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना सांगितले. तसेच आपल्यावर अनेक महिन्यांपासून हा अन्याय सुरू असून माझ्यासारख्या इतर ग्रामसेवकाचे वेतन काढले जात असताना अधिकाऱ्यांनी आठ महिन्यांपासून सूडबुद्धीने वेतन काढले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी या माध्यमातून केली आहे.

 कारवाई नियमानुसारच – संदीप गोडशलवार                                                                                                   वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्यानेच खरवडे यांच्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिल्याची कबुली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी दिली. परंतु या आदेशानंतर विस्तार अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाली असता प्राथमिक चौकशीमध्ये खरवडे यांच्या कामात अनियमितता आढळून आली. यामुळेच ते शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले असल्याची प्रतिक्रिया या संदर्भात पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी दिली. आणि खरवडे यांचे थकीत वेतन काढण्याबाबत प्रक्रिया सुरू असून लवकरच यांचे वेतन दिले जाईल असा विश्वास त्यांनी दिला.