दीक्षाभूमीवर भीमसागर

41

राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी चंद्रपूर दीक्षाभूमीवर दाखल

जय भीम च्या घोषनेने दुमदूमली दीक्षाभूमी

चंद्रपूर

.         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्धबांधवांना धम्मदीक्षा दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी; १६ ऑक्टोबर १९५६ला चंद्रपुरात अनुप्रवर्तन झाले. बाबासाहेबांच्या उपस्थितीत हजारोंनी बौद्धधम्म स्वीकारला. या क्रांतिकारी क्षणाची आठवण म्हणून दोन दिवसीय धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला. हजारोंच्या संख्येत बौद्धबांधव दीक्षाभूमीवर जमले. बाबासाहेबांना अभिवादन करीत ‘जय भीम’च्या गजराने रविवारी दीक्षाभूमी दुमदूमली होती.

.          महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन, पवित्र ऐतिहासिक दीक्षाभूमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सज्ज झाली. रविवार व सोमवारी दीक्षाभूमीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र तथा लगतच्या राज्यातील हजारो बौद्ध समाज बांधव दीक्षाभूमीवर दाखल झाले आहे.

.         बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन व धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या तेजस्वी दिनाच्या स्मरणार्थ रविवार १५ व सोमवार १६ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

.         आज रविवारी दुपारी 4 वाजता विश्वशांती बंधुत्व प्रेरित वाहनासह चंद्रपुरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यानंतर दीक्षाभूमी परिसरात धम्म ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटचे अध्यक्ष अरूण घोटेकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी उपस्थित होते. यानंतर धम्मज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त धम्ममेताघोष , भदन्त ज्ञानज्योती महास्थवीर संघारामगिरी, भदन्त सारीपुत, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जान्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवान,उपस्थित होते. सामूहिक बुद्धवंदना झाली.

आज बाबासाहेबांची अस्थिकलश मिरवणूक                                                                                                                                                         आज सोमवारी 16 ला सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिधातू कलशाची समता सैनिक दलाच्या पथसंचालनासह शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ‘बुद्धमय व आधुनिक विज्ञान ‘ या विषयावर परिसंवाद, दुपारी 1.30 वाजता सामूहिक बुद्धवंदना व भदन्त नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली धम्म प्रवचन होईल.