*गावाच्या स्वच्छतेसाठी गावकरी झाले पहारेकरी

40

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यावर सुरू आहे दंडात्मक कारवाई.

या उपक्रमाचे परिसरात होत आहे कौतुक.

सिंदेवाही 

.           लोकसहभागातून गावाचा विकास, या लोकाभिमुख उपक्रमास पुढे नेऊन, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी, आणि हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. स्वच्छता ही सभ्य आणि सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. स्वच्छ्ता ही गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. “स्वच्छता ज्याचे घरी, आरोग्य तेथे वास करी”, “वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासून मिळे मुक्ती” या म्हणी प्रमाणे जागरूक होऊन सिंदेवाही तालुक्यातील वासेरा ग्राम पंचायत चे सरपंच महेश बोरकर यांचे सह गावातील कर्तव्यदक्ष, व ध्येयाने प्रेरित होऊन काही नागरिक गावाबाहेर उघड्यावर घाण करणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी गावच्या सभोवताल पहाटेपासूनच जागली करीत असून अनेक नागरिकांवर दंडात्मक कारवाही केल्याने नागरिकांत बाहेर घाण करण्यासाठी जाण्याची चांगलीच भीती निर्माण झाली आहे. या उपक्रमाचे वासेरा परिसरात चांगलेच कौतुक करण्यात येत आहे.

.           स्वच्छतेमधून समृद्धीकडे जाण्यासाठी गावातील नागरिकांचा लोकसहभाग आवश्यक आहे. गाव हा विश्वाचा नकाशा , गावावरून देशाची परीक्षा , गावच भंगता अवदशा, येईल देशा ! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समर्पक आणि साध्य, सरळ भाषेत ग्रामागितेमध्ये गावाचे महत्व अधोरेखित केले आहे. गाव हा विश्वाचा मुळ घटक असतो, गावापासून शहर, शहरापासून राज्य, आणि राज्यापासून देश तयार झाला.

.           देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आधी गावे सुधारावी लागतील. असे तुकडोजी महाराज सांगतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, आणि पूर्वीपासून चालत आलेली टमरेल घेऊन बाहेर जाण्याची परंपरा बंद व्हावी. यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून गावागावात जनजागृती केली., घरोघरी शौचालय बांधण्यासाठी, आणि त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित बक्षिसे दिली. शौचालय बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आले. त्यानुसार लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र काहींनी त्या शौचालयाचा वापर न करता बाहेर उघड्यावर घाण करणे सुरू केले. त्यामुळे गावात अस्वच्छता निर्माण झाली. याबाबत जागरूक होऊन ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांसोबत चर्चा करून गावात पसरणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी नागरिकांना सोबत घेऊन हागणदारी मुक्त मोहीम सुरू केली. यासाठी पहाटे ५ वाजता पासून गावच्या सभोवताल खडा पहारा देऊन ज्यांचेकडे खरंच शौचालय नाही. अशा व्यक्तींना ग्राम पंचायत चे सार्वजनिक शौचालय मध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केले. काहीं व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काहीं वर तर स्वतःची घाण उचलण्याची सुद्धा कारवाही करण्यात आली. यामुळे आता ज्यांचेकडे खरंच शौचालय नाही. अशा व्यक्ती सध्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत.

.           सिंदेवाही तालुक्यात एकमेव वासेरा गावात हागणदारी मुक्तीसाठी पहाटेपासून नागरिकांची जागली सुरू असून या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वासेरा गाव विकासाकडे वाटचाल करीत असून या गावात पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी समस्या सरपंच महेश बोरकर यांचे नेतृत्वात दूर झाली असून अनेक हात पंपावर सौर ऊर्जेवरील पंप लावून पाण्याची समस्या सुरू झाली असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सांडपाण्याचा प्रश्न, कचऱ्याची विल्हेवाट याबाबत लवकरच नियोजन करण्यात येणार असल्याचे ग्राम पंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. आपला गाव, आपला विकास, या अभियानातून अनेक लोक उपयोगी उपक्रम राबविताना लोकसहभागातून गावाचा विकास साधून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवा. शौचालयाचा नियमित वापर करावा, पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नळाला तोटी लावून पाण्याचा योग्य वापर करून गावाला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच महेश बोरकर यांनी प्रसिध्दी माध्यमातून केले आहे.