तुटपुंज्या निधीमुळे घरकुलाचे बांधकाम अर्धवट…

39
  •  निधीमध्ये दुप्पट वाढ करण्याची गरज
  •  घराच्या बाजूलाच पाल टाकून उदरनिर्वाह सुरू

 

महेंद्र कोवले

सिंदेवाही

.           केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास, शबरी आवास, प्रधानमंत्री आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, आणि आता मोदी आवास योजने अंतर्गत अनेक गरीब, आणि गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेची अनुदानित राशी ही दीड लाखाच्या जवळपास असून या महागाईच्या काळात अशा तुटपुंज्या निधीमुळे गरिबांचे घरकुल स्वप्न अर्धवट राहत असल्याने त्याच घरकुलाच्या बाजूला पाल टाकून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकताना अनेक लाभार्थी दिसत आहेत. त्यामुळे या घरकुल योजनेचा मिळणारा निधी हा दुप्पट करण्यात यावा. अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून करण्यात येत आहे.

.           शासना मार्फत अनुसूचित जाती या प्रवर्गातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती मधील गरजू लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, भटक्या व विमुक्त नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, आणि आता इतर मागास प्रवर्गातील गरजू लाभार्थ्यांना मोदी आवास योजना मधून घरकुल देण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार कमीत कमी २८० चौरस फूट जागेमध्ये घरकुल बांधकाम करणे अनिवार्य आहे. या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाचे हप्ते मिळतात. ज्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे. अशा लाभार्थ्यांनी मिळालेल्या अल्पशा निधीत घरकुल बांधकाम सुरू केले आहे. मात्र सध्या बांधकाम साहित्याचे भाव गगनाला मिळालेले आहेत. तर बांधकाम कारागीर, आणि मजुरांची मजुरी पाहता घरकुल साठी मिळणारा निधी हा अत्यंत तुटपुंजा आहे. त्यामुळे बांधकाम सुरू केलेल्या लाभार्थ्यांनी अर्धवट बांधकाम सोडून कोणी नाशिक, पुणे, कंपनीला काम करण्यासाठी गेले. तर कुणी पाल टाकून त्याच घरकुलाचे बाजूला आपला संसार सुरू केला आहे. वर्षामागुन वर्ष जात आहेत. लोहा, गिट्टी, सिमेंट, विटा, यांचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र घरकुलाचा मिळणारा निधी मागील सात वर्षापासून जैसे थे आहे. काही लाभार्थी घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जाचा डोंगर उभा करून बचतगट, तर कुणी सावकारी पैसे घेऊन आपले घरकुल उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास रेती मोफत देण्याचे धोरण असताना सुद्धा लाभार्थ्यांना रेती मोफत दिली जात नाही. हा कृतिशुण्य कार्यक्रम असताना सुद्धा अधिकारी डोळेझाक पना करीत आहेत. घरकुल लाभार्थी स्वतःची ओळख पुढे करून दुकानदारांकडून उधारीवर गिट्टी, लोहा, सिमेंट, खरेदी केले. घरकुलाचे बिल निघाले की, उधारी पूर्ण करून देण्याचा शब्द दुकानदाराला दिला . परंतु अपेक्षित वेळी घरकुलाचा निधी मिळाला नसल्याने दुकानदारांची उधारी डोक्यावर बसली असून अनेकांच्या घरी दुकानदार उधारीसाठी येत असल्याने त्यांना वेळ मारून नेल्या शिवाय लाभार्थ्याकडे पर्याय नाही. शासनाने घरकुल दिले. मात्र तुटपुंज्या निधीमुळे लाभार्थी कर्जबाजारी झाला. त्यामुळे घरकुल योजनेच्या निधीमध्ये दुप्पट वाढ करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.