अश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप

41

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या ‌वर्षी लवकर या

पोलिसांचा चोख बंदोबस्त, ईरइ नदी येथे बाप्पाचे विसर्जन

चंद्रपूर 

.          गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात विसर्जन मार्ग दुमदुमून गेला. चंद्रपूर शहरात दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरात 250 सार्वजनिक गणेश मंडळांचा विसर्जन सोहळा दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाला. विसर्जन मिरवणुकीत भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळाले. भाविकांनी हे देखावे व गणेश मुर्ती पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

.          गेल्या १० दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण हजारोंच्या संख्येत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने गुरूवारी सकाळ होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई केली. विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गदीर्ने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

.          जटपूरा गेटवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात डिजे , ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘गणपती बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला.विसर्जनादरम्यान विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी चंद्रयान -3, शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्य अभिषेक, दोन हजार रुपयांचा नोटेला श्रद्धांजली, रेन वॉटर हार्वेस्टींग, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्याद्वारे जनजागृती केली. गणेश विसर्जन रात्री उशिरा 4 वाजेपर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते.

 

गणेश मंडळाचा सत्कार व महाप्रसाद वितरण

चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनाच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर शहर‌ कांग्रेस, किसान मजदूर कांग्रेस, यंग चांदा ब्रिगेड, शिवसेना (उद्धवव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विठाई बहुउद्देशीय संस्था, शिवा कोरेवार व सामाजिक संस्थांनी गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रपूर शहर बार अँन्ड रेस्टॉरंट व चंद्रपूर शहर वाईन शॉप असोसिएशन, गणराज कॅटरिंग, श्री अग्रेसन महिला मंडळ,कृपलानी चौक मित्र मंडळ, श्री राम वॉर्ड मित्र मंडळ, श्री साई सेवा मंडळ, तिरुपती बालाजी देवस्थान बल्लारपूर चंद्रपूर , झुलेलाल समाज या संस्थांनी मसाला भात, पुरी भाजी, पाणी व शरबत वितरण करण्यात आले.

डिजेच्या तालावर तरुणाई थिरकली

‘आ देखें जरा…’,’अहो शेठ, पाटील, तसेच जय जय महाराष्ट्र माझा, आणि ‘भारत का बच्चा -बच्चा जय श्रीराम बोलेगा’ अशा गाण्यांवर चंद्रपूर परिसरातील तरुण – तरुणाई बेधुंद होत थिरकली. प्रचंड उत्साही वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चंद्रपूरकरांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.