तब्बल … ४५ तासानंतर आढळला त्या गुराख्याचा मृतदेह

117

नदी ओलांडून घरी जात असताना गेला होता वाहून

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील घटना

चंद्रपुर

.           भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शिर नदी पलीकडे असलेल्या वसाहतीत राहत असलेले कवडू येटे हे नदी ओलांडून घरी जात असताना अचानक नदीला पाणी आल्याने वाहून गेले होते. दोन दिवस सतत शिर नदीत बोटच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू असताना तब्बल ४५ तासानंतर शिर नदीच्या तीरावर असलेल्या वीट भट्टी जवळ कवडू येटे यांचा मृतदेह सापडला.

.           भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील कवडू येटे हे नंदोरी गावातील शिर नदीच्या पलीकडे असलेल्या इंदिरा नगर वसाहतीत आपल्या पत्नी व मुलासह मागील ३५ वर्षापासून राहत होते. ते ४० वर्षापासून गावातील शेतकर्‍यांचे राखणीचे जनावरे दोघेही पती पत्नी मिळून राखत होते. २७ सप्टेंबर ला सार्वजनिक गणेश मंडळाचे जेवण असल्याने जनावरे गावात सोडून तो कपडे बदलवून जेवण करण्यासाठी येतो असे गावकर्‍यांना सांगून सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान शिर नदीच्या पात्रातून आपल्या घरी जात होते. शिर नदीतून जात असताना नदीच्या पात्रात पाणी कमी होते. ते शिर नदीच्या मधोमध असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते पाण्यात वाहून गेले. ही घटना प्रत्यक्ष त्याच इंदिरा नगर वसाहतीतून नंदोरी गावाकडे येत असलेल्या डवरे नावाच्या व्यक्तीच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्या नंतर गावकर्‍यानी नदी जवळ एकच गर्दी केली होती. गावातील काही युवकांनी तात्काळ नदीत उड्या घेऊन कवडू येटे यांचा शोध घेणे सुरू केले मात्र येटे यांचा शोध लागला नाही. याबाबत ठाणेदार अमोल काचोरे यांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मात्र रात्रीची वेळ असल्याने कवडू येटे यांचा शोध घेणे कठीण होत असल्याचे सांगत पोलीस परतले. दुसर्‍या दिवशी २८ सप्टेंबरला पोलीस प्रशासन आले नाही. मात्र आपत्ती व्यवस्थापनाची टिम दाखल होत नदीत बोट टाकून शोध मोहीम राबविली मात्र त्यादिवशी त्यांना खाली हात परतावे लागले. पुन्हा २९ सप्टेंबरला आपत्ती व्यवस्थापनाची टिम ने सकाळी शोध मोहीम सुरू केली असता नदी पात्राला लागून असलेल्या वीट भट्टी जवळ कवडू येटे यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले. कवडू येटे यांचा मृतदेह शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टिम, जिल्हा बचाव दल चे पुंडलिक ताकसांडे, अजय यादव, ताराचंद कोटकीडवार, सचिन उपरे, आपदा मित्र असलेले अप्पास संस्था ची रेस्क्यू टीम चे विशाल मोरे, हर्षल मोटके, पंकज खाजोने, हर्षल बाकडे, प्रशांत राऊत, अमित नन्नावरे, बंटी खडके तर नंदोरीचे तलाठी रविंद्र लोंढे, सरपंच शरद खामनकर,  ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच मंगेश भोयर आदीनी परिश्रम घेतले.

 

आता तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल काय ? 

.           नंदोरी बु येथे राहत असलेल्या मजुरांना स्वतःचे घर नसल्याने ग्रामपंचायत ने शिर नदीच्या पलीकडे पाच ते सहा कुटुंबांना जमिनीचे पट्टे दिले त्याला इंदिरा नगर वसाहत नामकरण करण्यात आले, त्यानंतर या परिसरात पुन्हा नागरिकांनी घरे बांधली. आता या परिसरात ३० कुटुंब वास्तवात आहे. मात्र यांना गावाकडे येण्यासाठी नदी ओलांडूनच यावे लागते. दूसरा पर्याय नाही. नदी पलीकडे असलेली वस्ती आणि शेतकर्‍यांची शेती दोघांनाही येण्या जाण्यासाठी मार्ग व्हावा या हेतूने १ करोड ८८ लाख रुपयाचा बंधारा मंजूर झाला. कामही सुरू झाले मात्र या बंधार्‍याला कमिशन खोरांची नजर लागली. आणि बंधारा अर्धवट राहिला. याचाच फटका येथील गरीब येटे कुटुंबांना बसला. अख्खं आयुष्य जनावरांची सेवा करण्यात घालविणार्‍या कवडू येटे याला या अर्धवट बंधार्‍याने गिळंकृत केले. नदी पलीकडे असलेल्या या वस्तीतील नागरिक आज ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतरही मरणयातना सहन करत आहे. राजकरण्याच्या व अधिकार्‍याच्या कमिशन खोरीत अडकलेल्या बंधार्‍याने निष्पाप कवडू येटे यांच्या मृत्यू झाला. आता तरी लोकप्रतिनिधींना जाग येतील काय ? असा सवाल येथील नागरिक करू लागले.

गुराख्याच्या मृत्यु अन जनावरे खुंटीला

.           मृतक कवडू येटे हा गावातील २० जनावरे राखणदारी पद्धतीने राखत होता . त्याला साथ होती त्याच्या पत्नीची .दोघेही मोठ्या गुण्या गोविंदाने सकाळी ११ वाजता गावातील पशूपालकांची जनावरे घेऊन चारण्यासाठी नेत होता . आणि सायंकाळी ६ वाजता जनावरांच्या मालकांच्या घरी सोडत होता . मात्र गुराखी कवडू येटे यांच्या अचानक दुर्दवी मृत्युने दोन दिवसापासून जनावरे खुंटीला बाधल्या गेले आहे . तर कवडू येटे यांच्या मृत्युने पशू पालकात चिंता पडली असून शोककळा पसरली आहे .