सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे वार्षिकोत्सवानिमित्त आनंद मेळावा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सांस्कृतिक, क्रीडा आणि अन्य उपक्रमांमध्ये भाग घेतल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि भविष्यात अधिक संधी उपलब्ध होतील, असे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक तथा सत्कारमूर्ती आत्मज मोरे (गट विकास अधिकारी, पं. स. सिंदेवाही) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजावून सांगत योग्य दिशादर्शन केले. त्यांनी मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक अशोक पिसे (गट शिक्षणाधिकारी) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगाची जाणीव करून देत कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. प्रमुख अतिथी अरविंद जैस्वाल (सचिव, विद्या प्रसारक संस्था, सिंदेवाही) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व पटवून देत प्रचंड यश संपादन करण्याचे आव्हान केले.
. या प्रसंगी आत्मज मोरे यांचा विशेष सत्कार संयोजक अरविंद जैस्वाल, सचिव विद्या प्रसारक संस्था तथा माझी सभापती प.स.सिंदेवाही आणि प्राचार्य प्रा. डॉ. राजेश डहारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये त्यांनी विविध पारंपरिक आणि आधुनिक खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी ठेवले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकता, स्वावलंबन आणि आर्थिक व्यवहारांचे महत्त्व समजले. त्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग नोंदवला.
. वार्षिकोत्सवानिमित्त महाविद्यालयात वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, बचाव स्पर्धा, पुष्प सजावट, डिजिटल फोटोग्राफी, स्पॉट ड्रॉइंग, रांगोळी, मेहंदी, संगीत स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतना अगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अमित उके यांनी व्यक्त केले.


