वासेरा मागासवर्गीय हायस्कूल जवळ सुरू झाला बियर बार !

30

◾ वासेरा ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
◾ ग्रामसभेमधून होणार पोलीस महासंचालकाकडे तक्रार

ग्रामपंचायत म्हणते आम्ही नाहरकत प्रमाणपत्र दिलेच नाही

सिंदेवाही

पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा वासेरा येथील मागासवर्गीय हायस्कूल जवळ बियर बार सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांनी थेट ग्राम पंचायत कार्यालय गाठून बियर बार संदर्भात विचारणा केली असता, सदर बियर बार सुरू करण्यास ग्राम पंचायत कडून कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसून याबाबत ग्रामसभा आयोजित करून पोलीस महासंचालक यांचेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सरपंच महेश बोरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ सांगितले.

सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वासेरा या गावातील ग्राम पंचायत कार्यालय, तंटामुक्त समिती , तसेच गावकरी, हे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा दृष्टीकोनातून नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. यापूर्वी सुद्धा गावात देशी दारूचा परवाना मिळावा या साठी ग्राम पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणून काही नागरिकांनी ग्राम पंचायत कडे मागणी केली होती. तेव्हा ग्राम पंचायत नी ग्रामसभा आयोजित केली होती. मात्र गावकऱ्यांनी ती ग्रामसभा उधळून लावत गावात कोणतेही बियरबार, शॉपी, देशी, विदेशी, अशा मध्याचे दुकान गावात सुरू करायचे नाही अशी भूमिका त्यावेळी गावकऱ्यांकडून घेण्यात आली. मात्र तब्बल दोन वर्षानंतर अचानक विद्यार्थ्यांच्या शाळेजवळ बियरबार सुरू झाला असल्याने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून बियर बार हटविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे वासेरा येथे पारिवारिक रेस्टॉरंट किंवा उपहार गृह सुरू करण्यासाठी भेंडाळा येथील सौ. ज्योती प्रकाश बनसोड यांनी ग्राम पंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे. मात्र ज्योती प्रकाश बनसोड यांनी कोणतेही रेस्टॉरंट किंवा उपहार गृह न लावता पोलिसांना हाताशी घेऊन चक्क दारूचे अवैध्य दुकान सुरू केले आहे. तसेच दारू दुकानाचा परवाना असल्याचे नागरिकांना सांगत आहेत. कोणतेही रेस्टॉरंट किंवा उपहार गृह सुरू असताना त्या दुकानाची वाढ करण्यासाठी बियर बार सुरू करायला शासनाकडून परवाना मिळत असला तरी अगोदर कमीत कमी सहा महिने रेस्टॉरंट किंवा उपहार गृह चालविणे आहे गरजेचे आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, मंदिर ,मस्जिद जवळ दारूचे दुकान सुरू करण्यास शासनाची मनाई आहे. असे असताना सुद्धा ज्योती प्रकाश बनसोड हे वासेरा येथील मागासवर्गीय हायस्कूल या माध्यमिक शाळेजवळ अगदी ६० – ७० फुटाच्या अंतरावर अवैध्य बियर बार सुरू केले आहे. जर बनसोड यांचेकडे बियरबार चा परवाना आहे. तर त्यांनी बारच्या दर्शनी भागात परवाना का लावला नाही ? असा प्रश्न गावातील सुजाण नागरिक करीत आहेत. ज्योती प्रकाश बनसोड ह्या बारचा परवाना असल्याचे गैरसमज नागरिकांमध्ये पसरवून शासनाच्या कायदेशीर नियमांना तिलांजली देण्याचे काम करीत असल्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या माध्यमिक शाळे जवळ बार सुरू झाल्याने विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या वर्तणुकीवर याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस विभागाने या बियर बार ची तात्काळ चौकशी करून या अवैध बियर बार वर बंदी घालावी अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

 

वासेरा येथे केवळ रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी ज्योती प्रकाश बनसोड यांनी ग्राम पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. तेव्हा या गावात बार किंवा इतर कोणतेही मद्य विकण्यास सक्त मनाई आहे. असे स्पष्ट सांगून त्यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. मात्र तरीही बनसोड यांनी बार सुरू केल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परीणाम होणार आहे. त्यामुळे सदर बियर बार हटविण्याची मागणी ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                        महेश बोरकर                                                             सरपंच, ग्राम पंचायत वासेरा

गावात सुरू झालेले बियर बार परवाना धारक आहे किंवा नाही, याची शहानिशा करून बार बंद करण्यासाठी कायदेशीर कारवाही करण्यात येईल. तसेच गावातील शांतता, सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी तंटामुक्त समिती मार्फत घेण्यात येईल.                                                                                                                                    राजू नंदनवार                                                           अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती वासेरा.