जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आदेश
ब्रह्मपुरी : येथील वंजारी हॉस्पिटल, ॲडव्हान्स हार्ट केअर मल्टीस्पेशालिस्ट अँड क्रिटिकल केअर या रुग्णालयाच्या अनेक तक्रारी माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार व शहरातील नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांनी दिनांक 17 एप्रिल 2025 ला जिल्हास्तरीय चौकशी समितीमार्फत रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हास्तरीय चौकशी समिती मार्फत प्राप्त झालेल्या अहवालात रुग्ण हिताच्या दृष्टीने सदर रुग्णालय हृदय शस्त्रक्रिया व त्या संबंधित चाचण्या करण्यास योग्य नसल्याने रुग्णालयातील कॅथलॅब व अतिदक्षता विभाग बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने रुग्णालयाला दिले आहे. यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार व ब्रह्मपुरी शहरातील नागरिक शारदा करकाडे, मुखरू व्यंकटराव मेश्राम व अजय चहांदे यांनी वंजारी हॉस्पिटल, ॲडव्हान्स हार्ट केअर मल्टीस्पेशालिस्ट अँड क्रिटिकल केअर या रुग्णालयाच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयाला त्रुटीची पूर्तता करण्यासंबंधी कळविले होते, मात्र वंजारी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर रुग्णालयाने सदर त्रूटीची पूर्तता योग्य रित्या केली नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय चंद्रपूर मार्फत दिनांक 17 एप्रिल ला जिल्हास्तरीय चौकशी समिती तर्फे वंजारी हॉस्पिटल ॲडव्हान्स हार्ट केअर मल्टीस्पेशालिस्ट अँड क्रिटिकल केअर ब्रह्मपुरी या रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात रुग्णालयातील कॅथलॅब मधील आवश्यक नियमांची पूर्तता न केल्यामुळे तसेच अतिदक्षता विभागात मुदतबाह्य औषधे असल्याचे आढळून आले. तसेच सदर रुग्णालयामध्ये निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याचे आढळून आले, त्यामुळे रुग्णांना जंतू संसर्ग होण्याचा धोका असल्याचे जिल्हास्तरीय चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद केले.
. त्यामुळे रुग्णहिताच्या दृष्टीने सदर रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया व त्या संबंधित चाचण्या करण्यास रुग्णालय योग्य नसल्याने वंजारी हॉस्पिटल ॲडव्हान्स हार्ट केअर मल्टीस्पेशालिस्ट अँड क्रिटिकल केअर ब्रह्मपुरी या रुग्णालयातील कॅथलॅब व अतिदक्षता विभाग बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने रुग्णालयाला दिला आहे. तसेच बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 1949 अंतर्गत व महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम सुधारित 2021 अंतर्गत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांनी सदर रुग्णालयाला आदेशाद्वारे कळविले आहे.