जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरसावले ना. मुनगंटीवार
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केल्या सूचना
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची समाजप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली आहे. विकासकामांसाठी नेहमीच तत्पर असलेल्या आ. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. वाढत्या तापमानाचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी त्यांनी शाळेच्या वेळा बदलण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती केली होती.या पत्राची तत्काळ दखल घेत, अवघ्या काही तासांतच शाळेच्या वेळांबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमालीचे तापमान असल्याने प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना वेळेत मुभा देण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी पत्र लिहिले होते. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापेक्षा जास्त असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना उष्माघातासारखे अनेक आजार होत असल्याचे दिसून येत आहे. उष्माघाताचे प्रमाण सातत्याने वाढणे योग्य नाही. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात यावी किंवा शाळेचे दुपारचे तास कमी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सूचविले होते.
. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक) उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली असून सद्या जिल्हयाचे तापमान ४५ डिग्रीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालय सकाळी १० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यात यावे,’ असे या आदेशात म्हटले आहे.
. हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार शाळा महाविद्यालयांच्या वेळांचे नियोजन करावे. थंड वर्गखोल्या, प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी. शाळेच्या वेळांमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुट्टी देण्यात यावी. उन्हाळ्यात विदयार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. दुपारच्या सत्रात मैदानावरील खेळांचे नियोजन करू नये, आदी सूचनांचा देखील यामध्ये समावेश आहे.