विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी ना. गडकरी यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
रहदारीला होणारी अडचण आणि अपघात रोखण्यासाठी केली नव्या उड्डाणपुलांची मागणी
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली. आ. मुनगंटीवार यांनी विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामासाठी दिलेल्या निवेदनावर ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मुनगंटीवार यांच्या सदैव पाठिशी असल्याचा विश्वासही दिला.
. निवेदनामध्ये मूल शहरानजीक असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 मूल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आरसीसी काँक्रीट ड्रेन मंजूर करणे, केंद्रीय मार्ग निधीच्या (सेंट्रल रोड फंड) माध्यमातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना मंजुरी देणे, तसेच कोठारी गावाजवळील 2 किमी अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे यांचा समावेश आहे.

. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसीलमध्ये कोठारी गावाजवळील पुलानजीक 2 किमी रस्त्याचे अपूर्ण बांधकाम काम पूर्ण करण्याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली. नॅशनल हायवे 353 बी बल्लारपूर-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम काम पूर्ण झाले आहे. 5 वर्षांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. या मार्गावरील पुलाजवळ 2 किमी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या मार्गावर बर्याच ठिकाणी मोठे खड्डे असल्याने रहदारीला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच याठिकाणी मोठे अपघातही झाले आहेत. या 2 किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे, परंतु आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही, याकडे आ. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर, केंद्रीय रस्ते निधीतून मुल शहराजवळील रेल्वे ओव्हरब्रिजचे बांधकाम व्हावे, असेही निवेदन त्यांनी ना. गडकरी यांना दिले. मुल शहराजवळील रेल्वे मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने जातात. तसेच याच मार्गाने मालगाडीचीही वाहतूक होते. त्यामुळे प्रत्येक अर्धा तासाला रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद होतो आणि वाहतूक खोळंबते. परिणामी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी येतात. शिवाय सरकारी काम करणार्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचण्यात बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो, याकडेही मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले.
. मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे ८ किलोमीटरचे आरसीसी काँक्रिट ड्रेन मंजूर करण्याची विनंतीही आ. मुनगंटीवार यांनी केली. हा महामार्ग बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा ही गावे आहेत. या गावांतर्गत महामार्गाच्या बाजुला जुना अरुंद नाला आहे. हा नाला तुटलेला असल्याने घाण पाण्याचा निचरा होत नाही. रस्त्यांची सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या नाल्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
. या गावांतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना आरसीसी काँक्रीट नाल्याच्या मंजुरीची आवश्यकता आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरी रोडची रुंदी 7 मीटर आहे. याठिकाणी प्रस्तावित आरसीसी काँक्रीट ड्रेन आणि डांबरी रस्ता अश्या एकूण 48.08 कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील अधिक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आले आहे. आपण त्यात लक्ष घालून कृपया तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा तालुक्यांमध्ये वेगाने औद्योगिकीकरण सुरू झाले आहे. हे तालुके चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे रहदारीच्या दृष्टिकोनातून काही रस्त्यांचे व पुलांचे निर्माणकार्य आवश्यक असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे उपस्थित केली. यामध्ये पोंभुर्णा येथील नागपूर, नागभीड, सिंदेवाही, मुल, खेडी आणि गोंडपिंपरीला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यांतर्गत किन्ही येथे मोठा उड्डाणपूल व येनबोडी, पळसगाव, किन्ही, इटोली, गिलबिली रस्त्यावर एका छोट्या उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे. मुल तालुक्यातील उमा नदीवर तसेच अंधारी नदीवर देखील एका मोठ्या पुलाचे निर्माण कार्य करावे, असे निवेदन आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिले आहे.