जागतिक मौखिक दिनानिमित्त विविध ठिकाणी आरोग्य तपासणी

24

Ø 20 मार्च ते 20 एप्रिल या कालावधीत मुख स्वस्थ मोहीम

चंद्रपूर : जागतिक मौखिक दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी ‘मुख आनंदी तर मन आनंदी’ हे घोषवाक्य दिले आहे. त्या अनुषंगाने जागतिक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे, दंत शल्य चिकित्सक डॉ. कासटवार आदी उपस्थित होते.

.    यावेळी डॉ. संदीप पिपरे यांनी, 20 मार्च ते 20 एप्रिल 2025 असा महिनाभर मुख स्वस्थ मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. सोनारकर यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये, त्यामुळे मुख कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे पालन करावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. कासटवार यांनी मुख कर्करोग पूर्वलक्षणे याबाबत संपूर्ण माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरिता मनोचिकित्सा तज्ज्ञ डॉ.संदीप भाटकर यांनी मौखिक आरोग्य आणि मानसिक आजार यांच्यातील शास्त्रीयदृष्ट्या संबंधांबाबत मार्गदर्शन केले.

.      कार्यक्रमाला दंतशास्त्र विभागातील डॉ. सुप्रिया वाघमारे, जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर, डॉ.पद्मजा बोरकर तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन तुषार रायपुरे व आभार अतुल शेंद्रे यांनी मानले.

विविध ठिकाणी दंत तपासणी शिबीर : जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनात व दंत शल्य चिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांच्या नेतृत्वाखाली देवाडा येथील डेबुसावली वृद्धाश्रम येथे मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. आयुष दहिवडे, डॉ. रोमल शेंडे यांच्यामार्फत एकूण 30 महिला व पुरुषांची तपासणी करून त्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वृद्धांना दातांची आंशिक कवटी बसविण्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी दंत तंत्रज्ञ अरविंद आंबुलकर, दंत सहाय्यक सचिन जुमडे, हर्षद दहेलकर आदी उपस्थित होते.

चंद्रपूर बसस्थानक येथे तपासणी : जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे व विभाग प्रमुख श्री. गोवर्धन यांच्या सहकार्यातून चंद्रपूर बसस्थानक येथे मौखिक आरोग्य तपासणी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील डॉ. फरिद पटवारी, डॉ. रिचा तराळे यांच्यामार्फत करण्यात आली.

घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन : जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पारिचारिका नर्सिग स्कूल, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पारिचरिका नर्सिग स्कूल व प्रभादेवी नर्सिंग स्कूलच्या जवळपास 50 विद्याथीनींनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा मुख रोगनिदान व औषध उपचारशास्त्र विभागाच्या डॉ. दीपशिखा मुसळे, डॉ. नेहा सोनवणे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.