कांग्रेस पक्षाच्या कारवाई ने घायाळ
विसापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान मुंबई गाठून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य केले. विधानसभेची उमेदवारी मिळेल. ही आशा होती. मात्र, ग्रह फिरले. बल्लारपूर विधानसभेची कांग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी बंडखोरी करून कांग्रेस ला आव्हान दिले. परिणामी लोकसभेत पक्ष प्रवेश, तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान निलंबित केले. ही नामुष्की डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) यांचेवर ओढवली. कांग्रेस पक्षाच्या कारवाई ने त्या चांगल्याच घायाळ झाल्या.
. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. वातावरण ऐन थंडीत गरम झाले आहे. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचते आहे. अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) यांनी महायुतीचे व तब्बल सहा पंच वार्षिक विधानसभा निवडणुकीत निर्विवादपणे पदरात पाडून घेणारे हेव्हीवेट उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंग रावत यांचे समोर त्यांनी तगडे आव्हान उभे करण्याच्या प्रयत्न केला आहे. सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक पूर्वी त्यांनी जनसंपर्क मोहिमेच्या दरम्यान कांग्रेस पक्षात प्रवेश घेवून देखील भूमिपुत्र ब्रिगेडचे नावाने प्रचार केला. ही बाब त्यांच्या अंगलट आली. तरीही कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळावी, म्हणून कांग्रेस पक्षाकडे किल्ला लढविला. शेवटच्या क्षणी बल्लारपूर विधानसभेची कांग्रेस उमेदवार म्हणून संतोष सिंग रावत यांचे वर शिक्कामोर्तब केले.
. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात २0१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान डॉ. अभिलाषा गावतुरे यांना प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यासाठी विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी निवडणूक लढली नाही. ऐन वेळी राजू झोडे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यांनी त्यावेळी तिसऱ्या क्रमांकाची 39 हजार ९५८ मते घेऊन भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. त्याच अनुषंगाने यावेळी विधानसभा निवडणूक व्हावी, हा प्रयत्न सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराकडून केला जात आहे. मात्र, आजघडीला पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मतदार प्रगल्भ झाले आहे.
. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणूक दरम्यान पक्षशिस्तीचा भंग व बंडखोरी करून पक्षाच्या उमेदवार विरुद्ध उघड आव्हान दिल्या प्रकरणी सहा वर्षासाठी १६ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार राजू झोडे यांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान कांग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश, तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान निलंबित, ही नामुष्की डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) व राजू झोडे या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर ओढवली आहे.
डॉ. गावतुरे दांम्त्यांना नाना पटोले यांनी दिला होता प्रवेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान मुंबई येथील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) व त्यांचे पती डॉ. राकेश गावतुरे यांना कांग्रेस पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी जिल्हा पातळीवर कांग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत कोणतीही सल्ला मसलत करण्यात आली नाही. त्यांच्या कांग्रेस पक्ष प्रवेशामुळे पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शेवटी त्यांनी देखील कांग्रेस ला दगा दिला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कांग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचे कारस्थान केले. परिणामी आता त्यांना सहा वर्षासाठी निलंबित होण्याची नामुष्की ओढवली आहे.