सुरजागड अवजड वाहतुकीने रस्त्याची दैनावस्था
अपघातात वाढ
कोठारी : सुरजागड अवजड वाहनाने आलापल्ली ते बल्लारपूर रस्त्याची दैनावस्था झाली असून अपघाताची मालिका सुरूच आहे. सोमवार ला ४ वाजताच्या दरम्यान कोठारी जवळ अडेझरी नाल्याजवळ दुचाकींचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले. विलास किसन सिडाम (६०) राहणार चेक परवाडा त. मारेगाव जिल्ह्य यवतमाळ व गजानन प्रकाश चांदूरकर (५०) रा. गौराळा, ता. वणी, जिल्ह्य यवतमाळ अशी जखमींची नावे आहेत.
. पोलीस सूत्रानुसार विलास सिडाम व गजानन चांदुरकर हे दोघेही कामानिमित्त गोंडपीपरी तालुक्यात दुचाकी क्र. एम एच एच ३४ ए एल ९६५३ या दुचाकीने गेले होते. काम करून परतीचा प्रवास करीत असतांना कोठारी जवळ अपघात घडला. अपघाताची माहिती कोठारी पोलिसांना समजताच तातडीने घटनास्थळावर पोहचवून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारीत उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.
. सुरजागड येथून लोह खनिज भरून रोज हजारो अवजड वाहने रस्त्यावरून दिवसरात्र धावत असतात. अवजड वाहनाने रस्त्याची दैनावस्था झाली असून अपघातात दिवसागणिक वाढ होत आहे. रस्त्याचे दुतर्फा असलेल्या सायडिंग रस्त्यावर खोल खड्डे पडले असून समोरून भरधाव येणाऱ्या वाहनांना साईड देतांना वाहन रस्त्याखाली उतरताच खोल खड्यात जाऊन अपघात घडत आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तीन वर्षापूर्वी बांधकाम केले. जंगलातून जाणारा मार्ग एकेरी असून अवजड वाहनांच्या वर्दळीने हलके, दुचाकी वाहनांना जीव धोक्यात घालून ये जा करावे लागत आहे. रस्त्याचे कडेला असलेल्या मुरमाचे सायडिंगवर खोल खड्डे पडले आहेत. याकडे बालाजी कंपनीचे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रस्त्याचे देखभालिचे काम पाच वर्षापर्यंत बालाजी कंपनीकडे आहे. मात्र कंपनी कुंभकर्णी झोपेत असून रस्त्याचे डागडुजिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सुरजागड अवजड वाहतुक कंपनी व रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या बेजबाबदार वृत्तीने सर्वसाधारण वाहतुकदारांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधिंचे लक्ष नाही. या कंपनीत राजकारणी नेत्यांचे वाहने लोह खनिज माल वाहतूक करीत आहेत हे विशेष. या कंपनीवर अपघात घडण्यास जबाबदार धरून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.