वाघाच्या हल्ल्यात शेळकरी ठार

39

बल्लारपूर वन परिक्षेत्रातील पुन्हा घडली घटना

बकऱ्या चारण्यासाठी गेला होता जंगलात

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील इसम जवळच्या जंगलात बकऱ्या चारण्यासाठी मंगळवार ( दि.१४ ) रोजी सकाळी ८.30 वाजता गेला. जंगलात वाघाचा वावर आहे. तुम्ही जंगलात जाऊ नका. असा सल्ला गस्तीवरील वन कर्मचाऱ्यांनी त्या इसमला दिला. मात्र त्याने कानाडोळा केला. अखेर वाघाच्या हल्ल्यात त्या इसमाचा बळी गेला. ही घटना बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना राखीव वन क्षेत्र क्रमांक ५१४ ए मध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या इसमाचे नाव वामन गणपती टेकाम ( वय ५९ ) रा. कोर्टीमक्ता, ता. बल्लारपूर असे आहे.

.       बल्लारपूर वन परिक्षेत्र अंतर्गत कोर्टीमक्ता गाव जंगलाला लागून आहे. वामन टेकाम हे कुटुंबाचा उदरनिर्वाह बकरी पालन करून करतात. मंगळवारी ते नेहमी प्रमाणे गावालागतच्या जंगलात सकाळी ८.30 वाजता बकऱ्या चारण्यासाठी गेले. दरम्यान जंगलात गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी जंगलात वाघाचा वावर असून वामनाला जंगलात बकऱ्या चारण्यास मज्जाव केला. मात्र त्याने वन कर्मचाऱ्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले. अशातच दुपारी १२ वाजता जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने झडप घालून वामन टेकामचा बळी घेतला.

.       या घटनेची माहिती होताच बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने घटनेचा पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केला. बल्लारपूर वन विभागाने मृतक वामन टेकामच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान दिल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी २0 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे व एका ठिकाणी लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू व सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करत आहे.