राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

52

बिअर शॉपी करिता मागितली होती १ लाखाची लाच

चंद्रपूर

.       बिअर शॉपीचा परवाना देण्यासाठी एक लाखाची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील या वरिष्ठ अधिकार्‍यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ या तीघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

.       प्राप्त माहितीनुसार घुग्घूस येथील ‘गोदावरी बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट’ च्या मालकाने नवीन बिअर शॉपीचा परवाना काढण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरीता अर्ज सादर केला होता. चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील आणि दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रादारास टाळाटाळ करीत परवाना मंजूर केला नाही. चेतन खारोडे यांनी तक्रारदारास बिअर शॉपीचा परवाना मंजुर करून देण्याचे कामाकरीता संजय पाटील यांचे व स्वत: करीता एक लाख रूपयाची मागणी केली.

.       यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली. या तक्रारीवरून २५ एप्रिल २०२४ व ३ मे २०२४ आणि ७ मे २०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान, चेतन खारोडे यांनी तक्रारदारास एक लाख रूपयाची मागणी केली व लाच म्हणून मागण्यात आलेले एक लाख रूपयाची रक्कम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्या वतीने स्विकारली.

.       लाच घेतांना रंगेहाथ अटक केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने आरोपींविरुद्ध  शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, नागपूर, अपर पोलीय अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांनी पार पाडली.