विंजासन रस्त्याच्या पडदीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

44

नागरिकांचा आरोप

भद्रावती : शहरातील भद्रनाग मंदिर ते ऐतिहासिक विंजासन बुद्ध लेणी कडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम सुरुवातीपासूनच वादात आहे. हा रस्ता तब्बल एक वर्षानंतर कसाबसा तयार करण्यात आला. या रस्त्याच्या कडेला पेवर ब्लॉक बसविण्यासाठी दोन्ही बाजूला सिमेंटच्या पडद्या बांधण्यात आल्या. मात्र या पडद्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या पडद्या अनेक ठिकाणी अल्पावधीतच फुटलेल्या आहेत.

.      या बांधकामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराकडून या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केला जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा संशयही येथील नागरिकांनी बोलून दाखविला आहे.सदर रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीट चा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक असे या रस्त्याचे स्वरूप आहे. हा रस्ता मंजूर झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर या रस्त्याचे बांधकाम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविषयी अनेक आरोप होत आहे. रस्ता पूर्ण तयार करण्यात आला असला तरी रस्त्यावर मध्ये मध्ये असणारे गॅप योग्य रीतीने भरण्यात न आल्याने नागरिकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे त्रासदायक होत आहे. पेवर ब्लॉक लावण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंटच्या पडद्या उभारण्यात आल्या.

.      मात्र निकृष्ट कामामुळे या पडद्या आठ दिवसातच अनेक ठिकाणी फुटलेल्या आहे. या रस्त्या बांधकामाच्या सुरुवातीपासूनच रस्त्याच्या दर्जा विषयी अनेक आरोप व तक्रारी होत आहे. मात्र संबंधित अधिकार्‍याकडून याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसुन येत आहे. हा रस्ता पुढे वेकोलीची एकता नगर वसाहत, कुणाडा, देऊळवाडा व माजरी गावाकडे जात असल्यामुळे या रस्त्यावर चांगलीच रहदारी असते. शिवाय या रस्त्यावरच एतिहासिक विंजासन बुध्द लेणी असल्याने या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहणांचिही गर्दी असते. मात्र या रस्त्याच्या दोषपूर्ण बांधकामामुळे या रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्ता बांधकामाची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करुन योग्य ती चौकशी करावी अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे.