टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांकरिता जलपात्र

34
  • प्रियदर्शिनी विद्यालय रामपुर शाळेचे विद्यार्थी
  • सेव्ह बर्ड अभियानांतर्गत उपक्रम

राजुरा : जागतिक चिमणीदिनानिमित्त रामपूर येथील प्रियदर्शिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांना पाणी पिण्याकरिता टाकाऊ वस्तूंपासून जलपात्र तयार करून जलपात्र झाडाला बांधून त्यात पाणी सोडले. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घराच्या छतावर सावलीमध्ये जलपात्र बांधून पक्षी संरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

.     प्रियदर्शिनी विद्यालयाच्या वतीने सेव्ह बर्ड अभियान राबविण्याचे ठरविले. २० मार्चला जागतिक चिमणीदिनाचे औचित्य साधत येथील इयत्ता आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांकरिता झाडांवर जलपात्र बांधून त्यात दररोज पाणी सोडण्याचे ठरविले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले जलपात्र शाळेच्या परिसरातील प्रत्येक झाडाला बांधून त्यात नित्यनेमाने पाणी सोडण्याचे काम सुरू केले आहे.

.     दिवसागणिक वनाचे क्षेत्र कमी होत आहे. शहरातील वृक्षांची संख्याही कमी होऊन काँक्रिट जंगल निर्माण होत आहे. सिमेंट काँक्रिटच्या वाढत्या जंगलामुळे अगदी पहाटेपासूनच चिमण्यांच्या चिवचिवाटासह किलबिलाट करणारे विविध प्रजातींचे पक्षी झपाट्याने कमी होत आहेत. अनेक पक्ष्यांचा पाण्यावाचून तडफडून जीव जातो. याकरिता आपल्या रहिवासी भागात झाडांवर आश्रयाला असलेल्या पक्ष्यांकरिता, त्यांचे प्राण वाचविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक ग्लास, डिस्पोजल यांच्यापासून जलपात्र तयार केले व ते जलपात्र पाणी भरून झाडाला बांधल्याने सध्या शाळेच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक मनोज पावडे, शिक्षक नितीन ठाकरे, महेंद्र मंदे, राजेश वाघाये, ममता नंदूरकर, सुमन, श्रीकृष्ण गोरे, प्रा. अभय बोभाटे, मंगला हटवार, योगिता झाडे, निलोफर खान, इंद्रराज वाघमारे, रमाकांत निमकर, प्रफुल्ल ठाकरे, सतिष पेटकर यांनी कौतुक केले.

उन्हाळ्याच्या दिवसांत वाढते तापमान पाहता लहान पक्ष्यांच्या जिवाची लाही लाही होत असते. अशा वेळेस आपण राहत असलेल्या परिसरात विद्यार्थी व नागरिकांनी आपल्या घरी, छतावर, खिडकीवर, झाडांवर पक्ष्यांसाठी जलपात्र लावावे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                 मनोज पावडे, मुख्याध्यापक, प्रियदर्शिनी विद्यालय, रामपूर