आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात शुद्ध दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन

39

वरोरा : महारोगी सेवा समिती द्वारा संचालित तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन, वरोरा येथे नुकतेच शुद्ध दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रशिक्षण पार पडले. हे प्रशिक्षण राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, चंद्रपूर अंतर्गत राबविण्यात आले.

.   सदर प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुहास पोतदार, प्राचार्य  आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, उद्घाटक डॉ. सुनील रोकडे, माजी प्रमुख शास्त्रज्ञ  केंद्रीय कापूस संशोधन केंद्र,  कृषी विज्ञान केंद्र , नागपूर हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात विविध विषयांवर तज्ञ वक्त्यांचे  व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. सुनील रोकडे यांनी शुद्ध दूध उत्पादन  काळाची गरज व सद्यस्थिती याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. मुकुंद पातोंड व डॉ. सुबोध गाजर्लवार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दूध व दुग्धजन्य  पदार्थ निर्मिती यावर प्रात्यक्षिके करून दाखविली.डॉ. मनोज जोगी यांनी दुग्धजन्य पदार्थातील सूक्ष्म जीव जंतूचे प्रात्यक्षिके सादर केली. डॉ. पांडूरंग कौठेकर यांनी दूध निर्मिती खर्च ताळमेळ व विक्री व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

.   पंचायत समिती वरोरा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. आनंद नेवारे यांनी शासनाच्या दूध उद्योग उभारणीसाठीच्या विविध योजनांबाबत  माहिती दिली. अन्न व औषध  प्रशासन स. आयुक्त जिल्हा चंद्रपूरचे  रोहन शहा यांनी भेसळ बाबत  कायदे संबंधित मार्गदर्शन केले व त्याचप्रमाणे श्री प्रफुल टोपले  स. आयुक्त  अन्न व औषध प्रशासन जिल्हा वर्धा यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी FSSAI परवाने व दूध भेसळ या विषयावर प्रकाश टाकला.

.   प्रशिक्षण समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, अन्न व औषध प्रशासन अधिकारी स. आयुक्त  प्रफुल्ल टोपले व स. आयुक्त रोहन शहा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण समन्वयक डॉ. मुकुंद पातोंड, विभाग प्रमुख पशुसंवर्धन  व दुग्धशास्त्र विभाग, सह समन्वयक डॉ. सुबोध गाजर्लवार, सहायक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग,  हर्षाली देशमुख, प्रयोगशाळा परिचर  व  सुभाष वेलादी यांनी प्रयत्न केले.