दिंडोरा बॅरेज प्रकल्पाचे काम बंद करू नये

43
  • लाभधारक हक्क बचाव समितीची मागणी

वरोरा : दिंडोरा बॅरेज प्रकल्पा अंतर्गत वरोरा तालुक्यातील २४ गावातील  जवळपास ९ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा आधार मिळणार आहे. त्यांना सिंचणासाठी पाईपलाइनद्वारे पाणी मिळणार आहे. त्यामुळे पिकांमध्ये भरघोस वाढ होईल तसेच कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वरोरा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटणार आहे. आणि संपूर्ण शहराला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होईल.

.     परंतु गेल्याकाही दिवसापासून यवतमाळ जिल्यातील काही शेतकरी प्रकल्पाचे काम वारंवार बंद पाडत आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. जर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास आल्यास वरोरा तालुक्यासोबतच वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी आणि वरोरा तालुक्यासाठी सिंचणासाठी राखीव पाणी मिळणार आहे. यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि विभागीय अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडावेत व लवकरात लवकर तोडगा काढावा परंतु प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अशी मागणी लाभधारक हक्क बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

.     प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास दिरंगाई होताना दिसल्यास संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आणि शहरवासीयांमध्ये जनजागृती करू आणि प्रकल्पाच्या जागेवरच ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिंडोरा बॅरेज प्रकल्प लाभधारक हक्क बचाव समिती वरोरा यांच्या तर्फे देण्यात आलेला आहे.

.     सध्या प्रकल्पासंदर्भात दोन गट निर्माण झालेले दिसत असून भविष्यात हे गट समोरासमोर आल्यास प्रकल्पाच्या जागेवरच संघर्ष निर्माण होऊ शकतो याची दक्षता घेऊन काम सुरु करणे ही संबंधित अधिकाऱ्यांसाठी कसोटीच असणार आहे.