तीन महिन्यांच्या बाळसह भाग्यश्रीने दिली बारावीची परीक्षा

34

बाळाच्या आजोबाने केला सांभाळ

कोठारी परीक्षा केंद्रातील प्रकार

कोठारी : बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेकरिता तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन  थेट परीक्षा केंद्रावर सकाळी दहा वाजता एक महिला  पोहचली. हे पाहतच परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी, शिक्षक, पोलिस सर्वच अवाक झाले. काही वेळानंतर ती महिला आपल्या तीन महिन्याच्या गोंडस बाळाला घेऊन पेपर देण्यासाठी आली होती. हे माहीत होताच परीक्षा प्रमुख, मुख्याध्यापक यांनी त्या बाळाचे पेपर सुटे पर्यंत काळजी घेतली. यामुळे  सावित्रीच्या लेकिमध्ये शिक्षणाची किती आवड असते त्याचे जिवंत उदाहरण बारावीच्या कोठारी परीक्षा केंद्रावर अनुभवास आले.

.         बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावर ३८६ विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सकाळी दहा वाजता पोहचले. त्यात आपल्या तीन महिन्यांच्या बाळासह भाग्यश्री रोहित सोनूर्ले परीक्षा केंद्रावर दाखल झाली. भाग्यश्री कोठारी गावातील रहिवासी असून तिच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत.तिला तीन महिन्याचा रोहन नावाचा गोंडस मुलगा आहे. लग्न झालं तरीही या सावित्रीच्या लेकीने शिक्षण सोडले नाही. जनता विद्यालय कोठारी येथे कला विभागातून तिने प्रवेश घेतला. यावर्षी ती बारावीत आहे.  बारावीच्या बोर्डाचा पहिला इंग्रजी पेपर होता. भाग्यश्री व तिचा पती रोहित मोलमजुरी करून चंद्रमौळी झोपडीत कुटुंबाचा उदरनिर्वाह व गुजराण करतात. तिचा पती आज  मजुरीसाठी गेला त्यामुळे मुलाचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणीही नसल्याने भाग्यश्री बाळा सोबत परीक्षा केंद्र गाठले सोबत बाळाचा पाळणा व पेपर सोडविण्याचा पॅड घेतला. परीक्षा केंद्रावर तान्हुल्या बाळासोबत भाग्यश्री दिसताच एकच आश्चर्य परीक्षा केंद्रावर पसरले. बाळासह परीक्षा कशी देणार यासाठी केंद्रप्रमुख अलोक खोब्रागडे व मुख्याध्यापक ठाकरे यांनी बाळाच्या व्यवस्थेची तजवीज केली.

.         मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पंख्याखाली बाळाची व्यवस्था व त्याचा सांभाळ करण्यासाठी आजोबा व महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. म्हणतात ना “घार आकाशी, पण लक्ष पिल्यापाशी” तसं भाग्यश्रीच झालं. अधूनमधून बाळ भुकेने रडत असल्याने तिला पेपर सोडून दूध देण्यासाठी यावे लागते होते. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी भाग्यश्री संघर्ष करीत होती तिची तळमळ बाळाने जवळून बघितली व दुध पिल्यानंतर गाढ झोपी गेला व पेपर सुटेपर्यंत उठलाच  नाही.एकीकडे शिक्षण घेण्याची जिद्द तर दुसरिकडे आईची माया परीक्षा केंद्रावर दिसून आली. सावित्रीच्या लेकीचा जगण्याचा व त्यातून भविष्य उज्वल करण्याचा संघर्ष अनेकांनी कोठारी केंद्रावर बघितला. तिच्यासाठी दहा मिनिटे अधिकचा वेळ पेपर सोडविण्यासाठी देण्यात आला. भाग्यश्रीने मुक्तपणे पेपर सोडविला व जनता शाळेतील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व महिला पोलिसांचे आभार मानत बाळसह घरी परतली.