विदर्भस्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीतुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जाणार

44

प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार सन्मान : ८ डिसेंबरला वरोऱ्यात भव्य विदर्भस्तरीय शेतकरी परिषद

चंद्रपुर

.         येथे वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपूर व जैन इरिगेशन सी. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील शेतकरी विखुरलेला असल्याने अधिकाऱ्यांच्या कामचुकार व वेळ काढू धोरणामुळे शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना एका मंचावर आणून शासकीय योजनेचा लाभ देण्यापासून तर इतर शेतकरी हिताचे अनेक ठराव या परिषदेच्या माध्यमातून घेतले जातील असे नरेंद्र जीवतोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून सांगितले. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

.         पूर्व विदर्भातील ५२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाची स्थापना केली आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीवरील नैसर्गिक आपत्ती व शेतकऱ्यावर येणारे मानवनिर्मित संकट आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर विचार मंथन करून पर्यायी उपाय योजना शोधण्यासाठी महासंघाच्या वतीने तालुका क्रीडा संकुल प्रांगणावर पहिल्या शेतकरी परिषद शेतकरी परिषदेचे व कृषी प्रदर्शनीचे आयोजन ८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन, राजमार्ग, जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ,आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, जिल्हाधिकारी विनय गौडा, मानस ऍग्रो चे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, जैन इरिगेशन जळगावचे विदर्भ व्यवस्थापक दिलीप पांगुळ, आत्माचे प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर उपस्थित राहणार आहे.

.         या परिषदेला जिल्हाभरातून दहा हजारांवर शेतकरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. या परिषदेमध्ये शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांपासून होणारा त्रास, कोळसा खाणी व इतर खाणींमुळे खोल जाणारी पाण्याची पातळी, कंपन्यांमधून निघणारा धूर आणि कोळसा वाहतुकीमुळे शेतीवर होणारे वाईट परिणाम, कृषी पंपास विलंबाने मिळणारी वीज जोडणी, जिल्ह्यातील उद्योजकाचा सामाजिक दायित्व निधी शेती विकासासाठी खर्च करणे, शेतकऱ्यांना त्यांच्या हिताच्या शासकीय योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यासह अन्य विषयावर चर्चा करून या संदर्भातील शेतकरी हिताचे ठराव पारित केले जाणार आहे. सदर ठरावच्या प्रती केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पाठवून त्याबाबत योग्य ते निर्णय घेण्याची मागणी त्यांच्याकडे केली जाणार आहे. शेतकरी परिषदेच्या प्रथम सत्रात प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांचे प्रगतशील शेतकरी संदर्भातील अनुभवाचे कथन तर द्वितीय सत्रात इतरांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहेत त्यानंतर सप्त खंजिरीच्या माध्यमातून प्रबोधन होणार आहे.

.         या परिषदेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याच्या १५ तालुक्यातील निवडक प्रयोगशील व कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते केला जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, उपाध्यक्ष आबीद अली, मानद सचिव यशवंत सायरे, सीईओ बालाजी धोबे, संचालक दिलीप फुलबांधे, डॉक्टर पावडे, बंडू डाखरे, सतीश बावणे, राजेश केलझरकर, लक्ष्मण घुगल, गणेश वाभीटकर, अशोक गायकवाड, नरेंद्र आमने, पलींद्रा सातपुते, अतुल लांजेवार, मंगेश दोनाडकर, हिरालाल बघेले व भोला मडावी यांनी यांनी दिली आहे. तसेच शेतकरी परिषदेला उपस्थित राहून कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास हातभार लावावा असे आवाहन आयोजकांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पी एम किसान योजनेकडे भर                                                                                                                                                                                                                                        पीएम किसान योजना जाहीर झाल्यानंतर त्याचा लाभ आधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जात होता. नंतर त्यात बदल करून तो लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्याची योजना शासनाने आखून तसे परिपत्रक काढले. परंतु त्याचे अपग्रेडेशन तलाठ्यांनी केले नाही. परिणामी तीन वर्षांपासून नोंदणी बंद आहे. त्यातच अधिकारी त्यातील पळवाटा शोधून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. यामुळे सदर शेतकरी परिषदेच्या माध्यमात कॅम्प लावून येणाऱ्या व वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे. यासाठी ११ स्टॉल लावले जाणार असून कृषी उत्पादक कंपन्यांचे संचालक व ११ कृषी अधिकाऱ्यांची टीम यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेतून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तीन टप्प्यात वार्षिक १२ हजार रुपये प्रति शेतकरी दिले जातात. तेव्हा वंचित सर्व शेतकऱ्यांनी सदर फॉर्म भरून घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.