शेतकुंपणाला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने”पत्रु”चा मृत्यू

38

भीतीपोटी प्रेत शेतात पुरले      :      शेतमालकाची कबुली

तोहोगावातील थरारक घटनेचा उलगडा

 

कोठारी

.         शेतातील पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्याने शेतकुंपणाला विद्युत तारा जोडल्या होत्या.या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शॉक लागून पाचगाव येथील पत्रु टेकाम(४५) याचा मृत्यू झाला.तोहोगाव शेतशिवाराव वर्धा नदीच्या सिंधी घाटा जवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.नीलकंठ धोटे(५९)या शेतकऱ्यांची शेती असून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याचेवर कलम ३०४,२०१ कलमाद्वारे गुन्ह्याची नोंद करीत कोठारी पोलीसांनी आरोपीस दि.२३नोव्हेला रात्री ८.३० वाजता अटक केली आहे.

.         गोंडपीपरी तालुक्यातील पाचगाव येथील पत्रु टेकाम हा १९ नोव्हेबर ला रात्रीच्या सुमारास घरून अचानक निघून गेला. घरच्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. त्याचा ठिकठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. गुरुवार दि. २३ नोव्हेला तोहोगावातील नीलकंठ धोटे यांचे शेतात दुर्गधी येत असल्याची कुजबुज मृतकाच्या नातेवाईकांना लागली. त्यांनी शेतात जाऊन शहानिशा केली व तोहोगाव पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी कोठारी पोलिसांना कळविले. घटनास्थळावर पोलीस पोहचून शोध घेतला व खड्डा खोदून प्रेत बाहेर काढले. प्रेत कुजक्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागेवर पाचारण करून उत्तरीय तपासणी केली. पत्रु टेकाम यांचा मृत्यू जिवंत तारांच्या स्पर्शाने झाल्याचे त्याचे शरीरा वर असलेल्या खुनावरून आढळून आले आहे.

.         बेपत्ता असलेल्या पत्रु टेकाम याचा मृतदेह तोहोगावाजवळ शेतात खड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृतकाच्या मागे पत्नी शालिनी व अर्णव व सोनिया अशी दोन लहान अपत्ये असून वडिलांची छत्रछाया हरपली असल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त करण्यात असून या दुर्दैवी घटनेमुळे टेकाम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

.         पत्रु टेकाम वाहन चालक होता.त्यांचेकडून काही महिन्यांपूर्वी अपघात घडला असल्याचे समजते.त्या घटनेमुळे तो विचलीय झाला व त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याने तो घरून निघून गेला असावा.विचलित मनस्थितीत रात्री भटकत असतांना तो शेतशिवारावर गेला व कुंपणाच्या तारांना जिवंत वीज प्रवाह जोडलेल्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. वयोवृद्ध नीलकंठ धोटे या शेतकऱ्यांनी वन्यप्राण्याकडून संरक्षण करण्यासाठी शेतीला ताराचे कुंपण केले होते. त्यांनी झटका मशीन न लावता कुंपणाला वीज जोडणी केली. रात्रीच्या दरम्यान आपल्या शेतात कुणी इसम येणार अशी दुर्दैवी घटना घडणार त्याच्या मनातही नव्हते. परंतु सदर प्रकाराने नीलकंठ घाबरला व प्रेत शेतातच खड्डा करून पुरले. घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी स्वतःच घेतलेल्या निर्णयाने तो अडकला. पोलिसांनी त्यास अटक करून गोंडपीपरी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पुढील चौकशीत आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.