रॉयल्टीच्या दुप्पट तिप्पट प्रमाणात मुरूमाचे उत्खनन

53

 महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

सिंदेवाही 

.            गौण खनिज साठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यात मूरुमाची सर्रास अवैध्यरित्या ओव्हरलोड व विना रॉयल्टीने वाहतूक सुरू असून अशा वाहनावर कारवाही करण्यास सिंदेवाही महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावागावातून करण्यात येत आहे.

.            सिंदेवाही तालुक्यात अनेक ठिकाणाहून मूरुमाचे उत्खनन सुरू असून गुरूबक्षाणी या कंपनीच्या वतीने मौजा वाकल या शेतशिवारतून मूरूमाचे उत्खनन सुरू आहे. या कंपनीच्या वतीने महसूल विभागाकडून काही ब्रास मूरूमाची रॉयल्टी काढून त्याच्या दुप्पट, तिप्पट मुरूम उचलण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. तसेच क्षमतेपेक्षा जास्त मुरूम गाडीमध्ये भरून ओव्हरलोड वाहतूक करण्याचे प्रकारही येथे वाढलेले आहेत. सिंदेवाही शहरातून जाणारा मुख्य मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम गुरुबक्षानी या कंपनीच्या वतीने सुरू आहे. त्यासाठी या कंपनीला मोठ्या प्रमाणात मुरूम लागत असल्याने त्यांनी शेकडो ब्रॉस मूरुमाची रॉयल्टी महसूल विभागाकडून काढलेली आहे. परंतु रॉयल्टी ही एका गट नंबरची काढली, मात्र उत्खनन दुसऱ्या गट नंबरच्या जागे मधून करण्यात येत आहे. तसेच रॉयल्टीच्या दुप्पट, तिप्पट प्रमाणात मुरूमाचे उत्खनन करून ओव्हरलोड वाहतूक करण्यात येत आहे.

.            महसूल विभागाचे त्या भागाचे तलाठी किंवा मंडळ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याच्या चर्चा तालुक्यातील अनेक गावात सुरू आहेत. एकाच रॉयल्टी वर अनेक फेऱ्या करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. टीप्पर, हायवा, यासारख्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुरूम भरून दिवसाढवळ्या ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अंतर्गत रस्ते सुद्धा प्रभावित झाले आहेत. गुरूबक्षानी या कंपनीचे अनेक ओव्हरलोड वाहतूक सुरू असताना सिंदेवाही महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा का करीत आहे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असून एकाच रॉयल्टी वर जास्त ट्रीप मुरूम मारत असून रॉयल्टीच्या दुप्पट, तिप्पट मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकाराकडे त्वरित लक्ष घालून शहानिशा करून कारवाही करावी अशी मागणी प्रसारमध्यामातून केली जात आहे.