माती कोसळून १२ ट्रक ५ डोझर मातीच्या ढिगाऱ्यात

34

दोन कामगार जखमी     :    वेकोलि माजरी कोळसा खाणीतील घटना

चंद्रपूर 

.         माजरी वेकोलि क्षेत्रातील न्यू माजरी ओपन कास्ट या खुल्या कोळसा खाणीत १२ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात १२ वाल्वो ट्रक व ५ डोझर दबल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. या खाणीतून माती उत्खनन करण्याचे कंत्राट के. जे. सिंग या कंपनीकडे आहे. माती डम्पिंगचे काम सुरू असताना ४० मीटर मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन कामगार किरकोळ जखमी झाले. दरम्यान वाहन चालकांनी प्रसंगावधान राखून वाहनातून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

.         प्राप्त माहितीनुसार के. जे. सिंग या कंपनीद्वारे माती उत्खनन करून न्यू माजरी ओपन कास्ट खाणीत डम्पिंग करण्याचे काम सुरु होते. काम सुरु असताना अचानक तेथील ४० फूटवरून मातीचे कोसळणे सुरू झाले. दरम्यान माती हळू हळू दोन टप्प्यात कोसळली. माती कोसळण्याची गती कमी असल्यामुळे वाहनांमध्ये असलेल्या चालकांना सुखरूप बाहेर पाडण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे मोठी जिवितहानी टळली. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत मातीखाली दबलेले वाहन काढण्याचे कार्य सुरु होते. या घटनेत दबलेल्या वाहनांची किरकोळ नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
ऐन दिवाळीच्या दिवशी सदर घटना घडल्याने खाणीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.