मळणीचे भाडे परवडत नसल्याने शेतकऱ्याने सोयाबीन पेटविले

82

दोन एकरातील सोयाबीन जळून खाक        उत्पादनात घट म्हणून घेतला निर्णय

 

चंद्रपूर

.         बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील शेतकरी अविनाश मोरे यांनी दोन एकरातील सोयाबीनचा ढीग मळणी न करता पेटवून दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कोठारी व परिसरात सोयाबीन काढणीला वेग आला असून, शेतकरी यंत्राद्वारे सोयाबीनची काढणी करून घेत आहेत. या वर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझाक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता.पिकाला वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या मात्र सोयाबीनच्या उत्पन्नात घट होत आहे.सोयाबीनसाठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

.         अशात कोठारी येथील शेतकरी अविनाश मोरे यांनी दोन एकरात सोयाबीन पीक लावले होते.मात्र रोगाच्या प्रदूर्भावाने पीक नष्ट झाले.पीक वाचविण्याचा प्रयत्न केला.सोयाबीन कापणी करून ढीग केला.सोयाबीन मळणीला मळणी यंत्राला शेतात आणले.अर्धा ढिक मळणी केल्यानंतर एक घमेले सोयाबीन निघाले.पूर्ण सोयाबीनच्या ढिगातून दोन घमेले सोयाबीन होणार होते.मळणी यंयरचे भाडेही त्यापासून निघणार नसल्याने अखेर ढीग पेटविण्याचा निर्णय घेतला. सोयाबीन पिकाकरिता हजारो रुपयांचा खर्च केला.पेरणी पासून कापणीपर्यंत खर्च करूनही उत्पादनांत घट येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अशात मळणीचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीही येणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठया संकटाला समोर जावे लागत आहे.

.         गतवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीन पेरणीला उशीर झाला. त्यामुळे सोयाबीन काढणीही उशिराने होऊ लागली आहे. दुसरे म्हणजे यावर्षी ‘येलो मोझॅक सोयाबीनवर पडला होता. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. गतवर्षी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे सोयाबीन भरभरून आले होते. परंतु यावर्षी जून महिन्यापासूनच पावसाने खंड दिला. त्यामुळे वेळेवर पिकांना पाणी मिळाले नाही. आता यापुढे रबी हंगामातील पिकांची कशी जोपासणा करावी? हाही प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

पिकांसाठी दरवर्षी उसनवारी                                                                                                                                                                                                                                                                                               चार महिने शेतात पिके चांगली येण्यासाठी काबाडकष्ट करावी लागत आहेत. परंतु त्या मानाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव काही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षीच शेतकऱ्यांना पिकांच्या फवारणीसाठी उसनवारी व कर्ज करून पिके घ्यावी लागतात.