*वन्यप्राण्यांच्या हौदोसाने धानाचे पीक उध्वस्त

41

 हातात येणारे पीक गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी  

सिंदेवाही

.           ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा शेत शिवारातील धानाचे पीक वन्यप्राण्यांनी उध्वस्त केले असून हातात येणारे पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. निगरगट्ट असलेल्या वनविभागाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गजानन मेश्राम आणि इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

.           चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे असून दररोज शेकडो पर्यटक जंगल भ्रमंती साठी इथे येत असतात. शिवणी वनपरिक्षेत्रातील सिरकाडा आणि पांगडी येथे सफारी गेट असल्याने पर्यटकांची येथे नेहमी वर्दळ असते. या वनपरिक्षेत्रातील वासेरा सह जामसाळा, मोहाडी, नलेश्र्वर, कुकडहेटी, चारगाव, कळमगाव, विसापूर, चक बामणी, माल बामणी, इटोली, खातेरा, पेटगाव, शिवणी, सिंगडझरी, सिरकाडा, पांढरवानी, पिपरहेटी, इत्यादी गावातील शेतकऱ्यांची शेती जंगल व्याप्त भागात असून मुख्य पीक धानाचे घेतल्या जाते. इकडून तिकडून कर्ज घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी आपली रोवणी केली. धानाचे पीक डौलदार असून लवकरच धानाची कापणी होणार होती. मात्र या भागातील वन्यप्राण्यांनी धानाचे पीक पूर्णतः उध्वस्त करून टाकले.

.            वन्यप्राण्यांची भीती असल्याने शेतकरी रात्रीला जागल करू शकत नाही. याचाच फायदा घेत वन्यप्राण्यांनी पिकाचे पूर्णतः नुकसान केले. सकाळी शेतकरी जेव्हा शेतावर गेले. तेव्हा त्यांना झालेला प्रकार डोळ्यादेखत बघावा लागला. मात्र हातात आलेले पीक एका रात्रीतून उध्वस्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. याबाबतची तक्रार संबधित विभागाला करूनही काही फायदा नाही. कारण विभागाला तक्रार करण्यासाठीं अनेक दाखले जोडून नंतर ऑनलाईन करून दिल्यावर अनेक दिवसानंतर तुटपुंजी मदत मिळणार. मात्र तो पर्यंत तोंडी आलेला आहार गेल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला तेव्हापासून शेतकरी राबराब राबून शेतीमध्ये धानाची रोवणी केली. आणि पीक जगवले.

.            पीक ऐन भरात असताना सुद्धा राखण केली. मात्र आता काही दिवसातच धानाची कापणी होणार असताना एका रात्रीतून वन्यप्राण्यांनी शेतीमध्ये हौदोस घालून हातात आलेले पीक उध्वस्त केल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. वनविभागाने वासेरा येथील शेतकरी गजानन मेश्राम यांचे शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी करावी. आणि पंचनामा करून त्यांना भरीव मदत द्यावी. तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून करण्यात येत आहे.