हिरालाल लोया विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

238

एकतीस हजार रुपयांची रोख बक्षीसे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान

वरोरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०२३ मध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्थानिक हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच पार पडला. दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातून शालान्त परीक्षा मार्च 2023 मध्ये प्रथम आलेल्या तसेच विविध विषयांत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या गुणवंत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हिरालाल लोया विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य  रविकांत जोशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया, संस्थेचे दुसरे सचिव रामबाबू लोया, भारत शिक्षण संस्थेचे सदस्य श्यामबाबू लोया उपस्थित होते.

माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च २०२३ मध्ये विद्यालयातून प्रथम आलेली विद्यार्थीनी कृतिका सोनेकर हिला संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया यांच्या हस्ते सात हजार पाचशे रुपयांची रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच विद्यालयातून द्वितीय आलेली विद्यार्थीनी खुशी डफ हिला संस्थेचे दुसरे सचिव रामबाबू लोया यांच्या हस्ते चार हजार रुपयांची रोख बक्षिसे तर विद्यालयातून तृतीय आलेली अनुष्का गाते हिला संस्थेचे सदस्य  श्यामबाबू लोया यांच्या हस्ते तीन हजार रुपयांची रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. याशिवाय वर्ग १० च्या सातही वर्गातून प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध विषयात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सोबतच हिरालाल लोया विद्यालयात वर्ग १ ते १० पर्यंत शिक्षण घेतलेला व आता नुकताच C A ची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी निमीष तेला यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात एकूण एकतीस हजार रुपयांची रोख बक्षीसे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. ही सर्व बक्षीसे भारत शिक्षण संस्था, विद्यालयातील सर्व अध्यापक/अध्यापिका, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, विद्यालयातील माजी अध्यापक  व कर्मचारी यांच्या सहकार्यातून देण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया,  रामबाबू लोया तसेच संस्थेचे सदस्य  श्यामबाबू लोया यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. विशेष निमंत्रित निमीष तेला यांनी आपले अनुभव सांगितले.

या गुणवंत सोहळ्याला विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुनीता मुळे, पर्यवेक्षिका ढोले, पर्यवेक्षक प्रभाकर ढाले, महेश डोंगरे  यांच्यासह विद्यालयातील सर्व अध्यापक आणि अध्यापिका तथा कर्मचारी तसेच वर्ग १० वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या स्वागत गीताने झाली.  प्रास्ताविक मोहन मसाडे यांनी केले तर संचालन देवतळे यांनी आणि आभार प्रदर्शन संचेती यांनी केले.