जागेअभावी वासेरा ग्राम पंचायतचा निधी परतीच्या वाटेवर

45

शासकीय गोडावून, आणि क्रीडांगणाचा लाखो रुपयांचा निधी गेला वाया

गावालगत असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवण्याची गरज

सिंदेवाही

पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या वासेरा ग्राम पंचायत ला कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने विकास कामाकरीता आलेली निधी परत जात असून गाव विकासापासून कोसो दूर जात असल्याने गावालगत असलेले शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जागा अधिग्रहित करणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

जवळपास साडे चार हजार लोकसंख्या असलेले वासेरा गाव असून गावात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ग्राम पंचायत वासेरा अंतर्गत शासनाच्या विकासभिमुख योजना राबविताना ग्राम पंचायत कार्यालय कडे कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने गाव विकास कामासाठी अडसर ठरत आहे. नुकताच या गावाकरिता २८ लाख रुपये किमतीचे साठवणूक भवन (गोडावून) मंजूर झाले. मात्र ग्राम पंचायत कडे कोणतीही जागा शिल्लक नसल्याने मंजूर झालेला निधी परत करून दुसऱ्या गावाला देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत २४ लाख रुपये किमतीचे क्रीडांगण तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र क्रीडांगणसाठी सुद्धा ग्राम पंचायत अंतर्गत कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव निधी परत करावी लागला. सध्या पशू वैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करिता निधी उपलब्ध झाला आहे. मात्र त्याकरिता सुद्धा अजूनही ग्राम पंचायत नी जागा उपलब्ध करून दिली नसल्याने निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे ग्राम पंचायत प्रशासनाकडून समजले आहे.

गावालगत शासनाची महसुली जागा असताना तत्कालीन सरपंच यांनी ग्राम सभेमध्ये वारंवार प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना शासकीय जागेची खैरात वाटली. जेणेकरून ते व्यक्ती ग्रामसभे मध्ये कोणतेही प्रश्न विचारू नये. मात्र ग्राम पंचायतला कोणतीही जागा अधिग्रहित करून ठेवली नाही. त्यामुळे सध्या गाव विकासासाठी कोणतीही इमारत बांधकाम असो की, भवन असो. कोणतीच जागा शिल्लक राहिली नाही. गावालगत असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवून ग्राम पंचायत कार्यालय मार्फत ती जागा महसूल विभागाकडून हस्तांतरित करून घ्यावी. तसेच गावाला लागून असलेली वनविभागाची ०.४७ आर जागा ही सुद्धा वनविभागाकडून हस्तांतरित करून त्या जागेवर अनेक शासकीय कार्यालय, बांधकाम करावे. अशी नागरिकांकडून मागणी केल्या जात आहे. गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून काही नागरिकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून ती जागा लाखो रुपयांना विकण्याचा सपाटा लावला आहे. त्या अतिक्रमण धारकाची जागा ग्राम पंचायत कार्यालयाने ताब्यात घेऊन गरजू आणि बेघर असलेल्या व्यक्तींना देण्यात यावी. मात्र ग्राम पंचायत कडून असे होताना दिसत नाही. खऱ्या अर्थाने गावाचा विकास साधायचा असेल तर सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्यांनी कठोर भूमिका घेऊन ठोस निर्णय घ्यावे लागतील. अन्यथा येणारी पिढी नैराश्येच्या गर्तेत ढकलली जाईल.