चंद्रपूर शहरात अनेक घरात पावसाचे पाणी शिरले

38

शहरातील जनजीवन विस्कळीत ; वीज कोसळून आठ गाईचा मृत्यू

शहरात जलतरण तलावाचे स्वरुप

चंद्रपूर

शहरात सलग दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचले. बालवीर वार्डातील अनेक घरात पाणी शिरले असून मुख्य मार्गावर आझाद बगीचाजवळ सर्वत्र पाणीच पाणी आहे. शहरातील अनेक रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप आले आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजता हलक्या पावसाच्या सरी पडल्या. मात्र आकाशात ढगांची गर्दी दाटलेली होती. अशातच ११.४५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर सर्वदूर पाणी साचले. मुख्य मार्गावरील आझाद बगीचा आणि कस्तुरबा मार्गांना जलतरण तलावाचे स्वरूप आले होते. अवघ्या दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने सखोल भागात पाणी शिरले.

शहरातील राजकला टॉकीज मागील बालवीर वार्ड परिसरातून मोठा नाला वाहतो. पावसामुळे हा नाला दुथडी भरून वाहू लागला. नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आणि संपूर्ण रस्ता व हा परिसर जलमय झाला. दुचाकी व चारचाकी वाहनेदेखील पाण्याखाली आली होती. अवघ्या दीड तासाच्या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या दाव्याची पोलखोल केली.

बाक्स

                                         वीज कोसळून आठ गाईंचा मृत्यू                                                                                                                                          चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये चंद्रपूर येथून जवळच असलेल्या लखमापूर गावशिवारामध्ये सकाळी ११ वाजताच्या दरम्यान वीज कोसळून आठ गाईंचा मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.                                                                                                                                                                                                                                                   घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार डाॅ. जितेंद्र गादेवार यांनी तलाठी तल्हार, पशुवैद्यकीय अधिकारी रामटेके यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गाईंची उत्तरीय तपासणी करून अहवाल पाठविण्याचे निर्देशही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. मृत गायीच्या मालकांना प्रतिगाय ३७ हजार ५०० रुपयांप्रमाणे तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई प्रशासनातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.