प्राचार्य मदनराव धनकर यांचे निधन

34

शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – हंसराज अहीर

चंद्रपूर- चंद्रपूर-गडचिरोली या जुळया जिल्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय व पत्रकारीता क्षेत्रातील दिपस्तंभ पूर्व प्राचार्य मदनराव धनकर यांच्या दुःखद निधनामुळे या सर्वच क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.

गेली 6 दशके विविध क्षेत्रांमध्ये आपल्या प्रज्ञेच्या बळावर धनकर सरांनी निरंतर ज्ञानोपासनेचे व्रत जोपासत समाजाला ज्ञान देण्याचा भगीरथ प्रयत्न केला. एखादा विषय कितीही क्लिष्ट असला तरी त्या विषयाला सोपे करुन व त्यात नाविन्याची भर घालत मदनरावांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे दिले आहेत त्यामुळेच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व प्राचार्य म्हणून त्यांची ख्याती होती. पत्रकारीता क्षेत्रातील त्यांचे योगदान अमुल्य आहे. हरिवंश या साप्ताहिकातील त्यांचे लिखान हे साहित्य व पत्रकारीता क्षेत्रातील लोकांसाठी चालते बोलते विद्यापीठच होते.

या सर्वसमावेशक व्यक्तित्वाच्या निधनाचे माझ्यासह अनेकांना अपार दुःख असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी शोकसंवेदना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.

 

सामाजिक,साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिशादर्शक व्यक्तिमत्त्व गमावले – ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. चंद्रपूरच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिशादर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक व्रतस्थ शिक्षक आणि साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीतील सक्रीय मार्गदर्शक गमावल्याची शोकसंवेदना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला चंद्रपूरचा सांस्कृतिक व ऐतिहासिक परिचय व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एक उत्तम अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विविध संस्थांचे आधारस्तंभ म्हणून त्यांचा नावलौकीक होता. 2012 मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात अखिल भारतातील मराठी साहित्यिकांनी एक उत्तम असे संमेलन अनुभवले.

त्यांच्या निधनामुळे चंद्रपूरच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.